पती-पत्नीतील संशयाचे वाढते सावट; पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्ह्यांची मालिका उघड Pudhari
पिंपरी चिंचवड

Marital Mistrust: पती-पत्नीतील संशयाचे वाढते सावट; पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्ह्यांची मालिका उघड

वैवाहीक नात्यांतील तणाव आता हिंसेत बदलतोय; संशय, संवादअभाव आणि ताण यांचा गंभीर परिणाम

पुढारी वृत्तसेवा

संतोष शिंदे

पिंपरी : पती-पत्नीच्या नात्यांमध्ये निर्माण होणारा तणाव आता गंभीर गुन्ह्यांत बदलू लागला आहे. पतीच्या खुनात पत्नीचाच हात असल्याची काही धक्कादायक उदाहरणे पिंपरी-चिंचवड शहरात समोर आली आहेत. या घटनांमुळे वैवाहीक नात्यांतील अस्थिरता आणि मानसिक असंतुलनाचा गंभीर प्रश्न पुढे येत आहे. या पार्श्वभूमीवर ‌‘पुढारी‌’ने यापूर्वी पत्नीकडून घडलेल्या काही ठळक गुन्ह्यांवर प्रकाश टाकला आहे. (Latest Pimpri chinchwad News)

पिंपरी-चिंचवड शहरात दरवर्षी सुमारे पन्नास खुनाच्या घटना घडतात. हा आकडा दरवर्षी बदलत असला, तरी अलीकडच्या काळात वैवाहीक कारणांमुळे घडलेल्या हत्येचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. यातील विशेष म्हणजे वैवाहीक खूनप्रकरणांपैकी काही गुन्ह्यात पत्नीचाच हात असल्याचे समोर येऊ लागले आहे. अशी प्रकरणे एकट्या पिंपरी-चिंचवडमध्ये नाही, तर राज्यभरात घडू लागली आहेत. पती-पत्नीतील वाद, चारित्र्य संशय, आर्थिक मतभेद, किंवा दीर्घकाळ चालत आलेला तणाव हे मुख्य कारण असल्याचे पोलिस सांगत आहेत. याशिवाय काही वेळा क्षुल्लक कारणावरून भावनिक उद्रेक होऊन जोडीदाराचा खून करण्यापर्यंत मजल गेल्याचीही काही उदाहरणे आहेत.

नकुल भोईर हत्या प्रकरणाने हादरले शहर

चिंचवड येथील सामाजिक कार्यकर्ते नकुल भोईर यांच्या हत्येने परिसरात खळबळ उडाली आहे. त्यांच्या पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने त्यांचा गळा आवळून खून केल्याचे समोर आल्याने राज्यभर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या तरुणाच्या हत्येमुळे विविध संघटनांनी निषेध नोंदवला आहे.

पत्नीचाही संशयामुळे घात

अलीकडे पती-पत्नीच्या नात्यांमध्ये वाढत्या दुराव्यामुळे संशयाची पाल चुकचुकू लागली आहे. केवळ पत्नीकडून नव्हे, तर पतीकडूनही पत्नीच्या जीवावर उठण्याच्या घटना समोर येत आहेत. अशा गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, तज्ज्ञांच्या मते वैवाहीक जीवन टिकवण्यासाठी परस्परांवरील विश्वास, संवाद आणि संयम हे घटक अत्यावश्यक ठरतात.

पती-पत्नीत असणारे मतभेद पूर्वी किरकोळ वादांपुरते मर्यादित होते; मात्र आता या वादाचे रूप हिंसेत आणि हत्यांमध्ये बदलताना दिसत आहे. संवादत्रुटी, संशय आणि राग यामुळे टोकाचा निर्णय घेतला जात आहे. अलीकडे धावपळीच्या जगात पती-पत्नीमध्ये मोकळा संवादही तितकाच गरजेचा बनला आहे. पती-पत्नीमध्ये होणारे वाद रोखण्यासाठी समुपदेशन हाच प्रभावी उपाय ठरू शकतो.
डॉ. विवेक मुगळीकर, सेवानिवृत्त पोलिस अधिकारी
शहरी जीवनशैलीत दाम्पत्यांवर अनेक ताण असतात. नोकरी, आर्थिक दडपण, व्यसनाधीनता किंवा संशय ही कारणे नात्याला अस्थिर करतात. संवाद थांबल्यावर हिंसेचा मार्ग निवडला जातो. पोलिस ठाण्यांमधील समुपदेशन कक्ष अधिक प्रभावीपणे कार्यरत करणे, हा एक महत्त्वाचा उपाय ठरू शकतो. याशिवाय मानसिक आरोग्य आणि नातेसंबंध सुदृढ ठेवण्यासाठी पती पत्नीमध्ये खुला संवाद असणे तितकेच गरजेचे आहे.
डॉ. पूजा मिसाळ, मानसोपचार तज्ज्ञ, पिंपरी-चिंचवड

पतीच्या हत्येची काही ठळक प्रकरणे

1. गहुंजे खून प्रकरण

गहुंजे येथे घरगुती कारणावरून पत्नी अंकिता सूरज काळभोर (24) हिने पती सूरज राजेंद्र काळभोर (28) याचा चाकूने वार करून खून केला. घटनेनंतर आरोपीने पोलिसांजवळ गुन्ह्याची कबुली दिली. दरम्यान, मृताच्या नातेवाईकांनी पोलिस आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढून आरोपीच्या इतर नातेवाईकांवरही गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद आहे.

2. आकुर्डी सुपारी खून :

पती येशू मुरुगन दास (45) याच्या त्रासाला कंटाळून पत्नी उर्सुला येशू दास (39) हिने त्याचा खून करण्यासाठी भाडोत्री मारेकऱ्यांना सुपारी दिल्याचा आरोप करण्यात आला. आकुर्डीतील गुरुदेवनगर येथे हा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणात पोलिसांनी उर्सुलासह भाऊराव आरे (24), रज्जाक शेख (19) आणि लखन कापरे (21) या तिघांना अटक केली होती.

3. दीराच्या मदतीने पतीचा खून

पत्नी मदिना हुजूर सय्यद (28) आणि दीर यांनी हुजूर महंमुद सय्यद (32) याचा खून करून पुरावा नष्ट करत आत्महत्येचा बनाव केला; मात्र पोलिसांनी संशय घेत तपास करत कट उघड केला. थोरवेवस्ती, चऱ्होली येथे ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी पत्नीसह दीराला अटक केली होती.

4. शवविच्छेदनात पतीच्या खुनाचे फुटले बिंग

पत्नी उषा राठोड हिने पती अनिल उत्तमराव राठोड (35) यांच्या मृत्यूला आत्महत्या असल्याचे पोलिसांना भासवले; मात्र पोलिसांना संशय आल्याने त्यांनी दुसऱ्यांदा शवविच्छेदन केले. यात खून झाल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी अनिल यांच्या भावाने वाकड पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून उषा राठोडविरुद्ध गुन्हा दाखल आहे.

5. प्रेमात अडथळा ; पतीचा खून

दिघीतील डुडुळगाव येथे पत्नी जेबा आमुसाब मुल्ला (30) आणि अब्दुल मकबुल मलिक (45) यांनी पती आमुसाब मुल्ला (34) याचा प्रेमसंबंधात अडथळा येत असल्याने निर्घृण खून केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणातही सुरुवातीला पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न अपयशी ठरला. तांत्रिक तपासातून सत्य बाहेर आले आणि दोघांनाही पोलिसांनी अटक केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT