पिंपरी चिंचवड : मनोज जरांगे पाटील शुक्रवारी(दि.२९ )रोजी मुंबईत आझाद मैदानावर मराठा आरक्षण मिळविण्यासाठी उपोषणास बसणार असल्यामुळे अनेकजण मोठ्या संख्येने मुंबईकडे निघाले आहेत. तळेगाव-चाकण रोडवर गुरुवारी (दि.२८) मध्यरात्री पासूनच भगवे झेंडे आणि जरांगे पाटलांचे फोटो आणि बॕनर लावलेले चारचाकी, टेम्पो, ट्रक, दुचाकी आदी लोकांनी खचाखच भरलेली हजारो वाहने मुंबईकडे निघाली आहेत.
वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या आहेत. यामुळे अधून-मधून वाहतूक कोंडी होत आहे. वाहतूक कोंडी होवू नये आणि झाल्यानंतर सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलीसांची तारेवरची कसरत होत आहे. संघर्षयोध्दा जरांगे पाटलांचा विजय असो!एक मराठा लाख मराठा!मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहीजे!अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला आहे.
तळेगाव दाभाडे स्टेशन येथील मराठा क्रांती चौकात जरांगे पाटलांचे जीसीबीने फुलांचा मोठा हार घालून स्वागत करण्यासाठी तुफान गर्दी जमली आहे. जरांगे पाटील तळेगाव दाभाडे येथे रात्री १०वा.सुमारास येण्याची शक्यता आहे. मुंबईस जाणा-या लोकांना जागोजागी नागरिक जागोजागी खाण्याची,चहापाण्याची सोय करीत आहेत. मावळात जरांगे पाटील जाणार असलेल्या मार्गावर जागोजागी पोलीस पथके तैनात केलेली आहेत.