

Jarange Patil protest route on
पिंपरी : मराठा आरक्षणासाठी काढण्यात येणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चामुळे पुणे-मुंबई, पुणे-नाशिक व चाकण मार्गावरील वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता असल्याने पिंपरी-चिंचवड पोलिसांनी वाहतूक वळवली आहे. तसेच, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी आज (दि.२८) पहाटेपासून मोर्चा मार्गावर पोलीस तैनात करण्यात आले आहेत. सकाळी सहापासूनच रस्ते मोकळे करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
मनोज जरांगे पाटील शिवनेरी किल्ल्याचे दर्शन घेऊन नारायणगाव- मंचर-खेड-चाकण-तळेगाव- लोणावळा मार्गे आझाद मैदान, मुंबईकडे रवाना निघाले आहेत. त्यांच्या सोबत मोठ्या प्रमाणावर समाजबांधव सहभागी झाले आहेत. या मार्गावर मोठी गर्दी झाली असल्याने वाहतूक कोंडी टाळणे आव्हानात्मक ठरणार आहे.
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाचे उपायुक्त विवेक पाटील यांनी मोटार वाहन कायद्याच्या कलमान्वये खालील आदेश जारी केले आहेत.
- तळेगाव-चाकण महामार्ग (NH 548D) वरून ये-जा करणारी वाहने पर्यायी मार्गाने वळवली आहेत.
- मुंबईकडून चाकणकडे जाणारी वाहने सेंट्रल चौक-भक्ती शक्ती-तळवडे चौक मार्गे.
- मुंबईकडून नाशिककडे जाणारी वाहने सोमाटणे टोल नाका-भक्ती शक्ती चौक-भारत माता चौक-देहूफाटा-चाकण चौक-आळंदी-खेड बायपास मार्गे.
- जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील वाहने सेंट्रल चौक, मुकाई चौक किंवा सोमाटणे फाटा मार्गे द्रुतगती मार्गावर वळविण्यात आली आहेत.
- पुणे-नाशिक महामार्ग भारत माता चौक-देहूफाटा-आळंदी-खेड बायपास मार्गे
या आदेशातून रुग्णवाहिका, अग्निशामक व अन्य अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळण्यात आली आहेत. उर्वरित सर्व वाहनांना मात्र पोलिसांच्या सूचनेनुसार पर्यायी मार्गानेच जावे लागणार आहे.
"मोर्चा मार्गावर वाहतूक विस्कळीत होऊ नये म्हणून पोलिसांनी सकाळपासूनच मोठा फौजफाटा तैनात केला आहे. “सामाजिक सलोखा अबाधित ठेवून नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी वाहतूक शाखा पूर्ण सतर्क करण्यात आली आहे,”
- विवेक पाटील, पोलिस उपायुक्त, वाहतूक विभाग