108 Ambulance Pudhari
पिंपरी चिंचवड

Maharashtra 108 Ambulance Service: सांगवीत ९० अत्याधुनिक रुग्णवाहिका महिनाभरापासून धूळ खात; रुग्णसेवेत दाखल होण्याची प्रतीक्षा

राज्यात दररोज १०८ सेवेला ५ ते ६ हजार कॉल; नव्या रुग्णवाहिकांमध्ये मिनी आयसीयूच्या सुविधा, डिसेंबरपर्यंत संख्या ३५० होण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

सांगवी: एखाद्या कुटुंबातील व्यक्ती अचानक आजारी पडते. अपघात होतो किंवा हृदयविकाराचा झटका येतो... अशा वेळी संपूर्ण कुटुंबाची धावपळ सुरू होते. रुग्णाला वेळेत रुग्णालयात पोहोचवण्यासाठी नातेवाईकांची एकच धडपड असते. त्या क्षणी रुग्णवाहिकेचा आवाज म्हणजे संकटात सापडलेल्या कुटुंबासाठी आशेचा किरण असतो. कारण अनेकदा वेळेवर मिळालेली वैद्यकीय मदत एखाद्याचे आयुष्य वाचविण्यासाठी महत्त्वाची ठरते.

मात्र, याच महाराष्ट्रात अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांनी सज्ज असलेल्या सुमारे ९० रुग्णवाहिका गेल्या महिनाभरापासून सांगवी येथील उरो रुग्णालयाच्या परिसरात उभ्या असल्याची माहिती समोर आली आहे. डिसेंबरपर्यंत या गाड्यांचा आकडा वाढून 350 होण्याची चर्चा आहे. एकीकडे दररोज हजारो नागरिक १०८ रुग्णवाहिका सेवेकडे मदतीची अपेक्षा ठेवून संपर्क साधत असताना दुसरीकडे या गाड्या प्रत्यक्ष रुग्णांच्या सेवेत कधी दाखल होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस (MEMS) प्रकल्पांतर्गत मोठी तयारी!

महाराष्ट्रातील आपत्कालीन आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस (MEMS) प्रकल्पांतर्गत १ हजार ४५६ रुग्णवाहिकांची तयारी सुरू आहे. नव्या रुग्णवाहिकांचे उत्पादन पूर्ण होत जाईल, त्यानुसार त्या टप्प्याटप्प्याने राज्यात दाखल होत आहेत. याच प्रकल्पातील सुमारे ९० रुग्णवाहिका सांगवी येथील उरो रुग्णालयाच्या परिसरात उभ्या असून, त्यांची तांत्रिक काम सुरू आहे. मात्र, या रुग्णवाहिकांचे लोकार्पण आणि प्रत्यक्ष सेवेत दाखल होण्याची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. या गाड्यांचे जिल्हानिहाय वितरण कधी होणार आणि महाराष्ट्रातील गरजू रुग्णांना त्याचा लाभ कधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दररोज रुग्णवाहिकेसाठी ५ ते ६ हजार कॉल्स

१०८ रुग्णवाहिका सेवेचा कारभार स्टेट इमर्जन्सी रिस्पॉन्स सेंटर (SERC) या नियंत्रण केंद्रातून चालविला जातो. नागरिकांकडून १०८ क्रमांकावर मदतीसाठी फोन आल्यानंतर रुग्णाची माहिती, ठिकाण आणि परिस्थिती समजून घेऊन जवळची रुग्णवाहिका घटनास्थळी पाठविण्याची प्रक्रिया केली जाते. या नियंत्रण केंद्रात दररोज १२ तासांच्या शिफ्टमध्ये साधारण ५ ते ६ हजार कॉल्स प्राप्त होत असल्याचे डॉ. मेघना झेंडे यांनी सांगितले. हा आकडा केवळ फोनचा नसून संपूर्ण महाराष्ट्रात आपत्कालीन वैद्यकीय मदतीची किती मोठी गरज आहे, हे अधोरेखित करणारा आहे.

रुग्णवाहिकेतच मिळणार ‘मिनी आयसीयू’!

या नव्या रुग्णवाहिकांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांची व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णाला रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच आवश्यक आपत्कालीन उपचार मिळावेत, या उद्देशाने या रुग्णवाहिका मिनी आयसीयूच्या धर्तीवर तयार करण्यात येत आहेत. हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांसाठी डिफिब्रिलेटर, गंभीर रुग्णांसाठी व्हेंटिलेटर, अपघातग्रस्तांना सुरक्षितपणे हलविण्यासाठी स्पाइन बोर्ड आणि स्कूप स्ट्रेचर, तसेच आपत्कालीन औषधे व जीवनरक्षक उपकरणांचा यामध्ये समावेश असणार आहे. रुग्णालयापर्यंत पोहोचण्याच्या प्रवासातच रुग्णाला आवश्यक वैद्यकीय मदत मिळण्यास या सुविधा उपयुक्त ठरणार आहेत.

जुन्या रुग्णवाहिकाही होणार अद्ययावत!

महाराष्ट्रात गेल्या १२ वर्षांपासून १०८ रुग्णवाहिका सेवा कार्यरत आहे. सध्या राज्यात ९३७ रुग्णवाहिका सेवेत असल्याचे BVG च्या EMS Training तसेच Operation and Government Relations विभागाच्या COO-SL डॉ. मेघना झेंडे यांनी सांगितले. जुन्या रुग्णवाहिकांमधील वैद्यकीय किट आणि उपकरणे बदलून त्या अद्ययावत करण्याचे नियोजन असून, आवश्यक बदल केल्यानंतर या रुग्णवाहिका पुन्हा सेवेत वापरता येणार आहेत. त्यामुळे नव्या गाड्यांची भर पडण्याबरोबरच सध्या कार्यरत असलेल्या रुग्णवाहिकांची कार्यक्षमताही वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

रुग्णवाहिका उभ्या नकोत, त्या रुग्णांच्या मदतीला धावल्या पाहिजेत!

सांगवी येथील उरो रुग्णालयाच्या परिसरात महिनाभरापासून उभ्या असलेल्या सुमारे ९० रुग्णवाहिका हा केवळ एका ठिकाणचा विषय राहिलेला नाही. हा महाराष्ट्रातील आपत्कालीन आरोग्यव्यवस्थेशी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेशी जोडलेला प्रश्न आहे. या गाड्या जितक्या लवकर रस्त्यावर उतरतील, तितक्या लवकर गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचू शकेल.

बेसिक आणि ॲडव्हान्स लाइफ सपोर्टचे दोन प्रकार

नव्या रुग्णवाहिकांमध्ये बेसिक लाइफ सपोर्ट (BLS) आणि ॲडव्हान्स लाइफ सपोर्ट (ALS) असे दोन प्रकार असणार आहेत. बेसिक लाइफ सपोर्टमध्ये आवश्यक आपत्कालीन वैद्यकीय सुविधा असतील, तर ॲडव्हान्स लाइफ सपोर्टमध्ये डिफिब्रिलेटर, व्हेंटिलेटर यांसारखी प्रगत उपकरणे उपलब्ध असतील. रुग्णाच्या प्रकृतीनुसार योग्य प्रकारची रुग्णवाहिका पाठविणे शक्य होणार असल्याने आपत्कालीन आरोग्यसेवेला अधिक बळ मिळण्याची अपेक्षा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT