संतोष शिंदे
पिंपरी: नव्याकोऱ्या आलिशान मोटारीच्या पुढे-मागे वाहनांचा ताफा, नंबरप्लेटवर आडनावापुढे 'सरकार'ची उपाधी आणि रस्त्यावर शक्तिप्रदर्शनाचा थाट... उद्योगनगरी पिंपरी-चिंचवड लगतच्या परिसरात काही नवश्रीमंत तरुणांकडून संपत्तीचे असे ओंगळवाणे प्रदर्शन सुरू झाले आहे. जमिनींना सोन्याचा भाव आल्याने आर्थिक सुबत्ता लाभलेल्या कुटुंबांतील काही तरुणांनी नव्या मोटारीच्या खरेदीला प्रतिष्ठेचा सोहळा बनवला आहे. मात्र, या रुबाबापायी सर्वसामान्यांना वेठीस धरले जात असून, अपघाताचा धोकाही निर्माण होत आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत पोलिसांनी संबंधितांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
पिंपरी-चिंचवड शहराच्या विस्तारामुळे वाकड, हिंजवडी, बावधन, चाकण आणि महाळुंगे परिसरातील जमिनींच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. जमीन विक्रीतून अनेक शेतकरी कुटुंबांच्या हाती कोट्यवधी रुपये आले. त्यातून आलिशान बंगले, महागड्या मोटारी आणि बदललेली जीवनशैली पाहायला मिळत आहे. मात्र, या आर्थिक सुबत्तेत वाढलेल्या काही तरुणांमध्ये आपले वर्चस्व दाखवण्याची चढाओढ सुरू झाली आहे. त्यातूनच नव्या वाहनांच्या खरेदीला शक्तिप्रदर्शनाचे स्वरूप प्राप्त होत आहे.
कार शोरूममधून बाहेर पडण्यापूर्वीच नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या पाच ते पंचवीस वाहनांची जमवाजमव केली जाते. नव्या मोटारीला मध्यभागी ठेवून हा ताफा घराच्या दिशेने निघतो. कर्णकर्कश हॉर्न, आरडाओरडा आणि मोबाइलवर चित्रीकरण करत ही मिरवणूक पुढे सरकते. काही ठिकाणी रस्त्यात वाहने थांबवून फोटोसेशनही केले जाते. त्यानंतर या सोहळ्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसिद्ध करून आपला गोतावळा किती मोठा आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
या शक्तिप्रदर्शनाचा फटका रस्त्यावरून जाणाऱ्या सामान्य नागरिकांना बसत आहे. ताफ्यातील वाहने रस्त्याच्या अनेक मार्गिका व्यापून पुढे सरकल्याने इतर वाहनांची कोंडी होते. अचानक वेग वाढवणे, मार्गिका बदलणे आणि इतर वाहनांना पुढे जाण्यापासून रोखणे यामुळे अपघाताला निमंत्रण मिळते. अशाच एका रॅलीमुळे यापूर्वी मुंबई-बंगळुरू महामार्गावरील वाहतूकही ठप्प झाल्याची नोंद आहे. अशा कोंडीत रुग्णवाहिका किंवा अग्निशामक वाहन अडकल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे संपत्तीचे प्रदर्शन करताना सामाजिक भान जपण्याची गरज अधोरेखित होत आहे.
तरुणांमध्ये रुजतेय चुकीची समजूत
आर्थिक ताकद दाखवण्याच्या या स्पर्धेला सामाजिक वर्चस्वाची किनारही लाभू लागली आहे. मोठा ताफा म्हणजे मोठी प्रतिष्ठा, अशी चुकीची समजूत तरुणांमध्ये रुजण्याचा धोका निर्माण झाला आहे. सार्वजनिक रस्त्यावर इतरांना अडवून आपले महत्त्व सिद्ध करण्याची मानसिकता कायद्याबद्दलचा आदर कमी करणारी ठरत आहे. सोशल मीडियावरील प्रसिद्धीच्या हव्यासातून अशा प्रकारांचे अनुकरण वाढण्याचीही शक्यता आहे. व्यक्तिगत आनंद साजरा करण्याच्या नावाखाली इतरांच्या सुरक्षिततेशी तडजोड करणे सामाजिक स्वास्थ्यासाठी घातक असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
वाहतूक पोलिस आक्रमक
वाहतूक पोलिसांनी या प्रकारांची गंभीर दखल घेतली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओंच्या आधारे वाहनांची ओळख पटवून संबंधित चालकांचा शोध घेतला जात आहे. वाकड, बावधन, हिंजवडी, चाकण आणि महाळुंगे परिसरात अशा रॅलींप्रकरणी गुन्हे दाखल झाल्याची माहिती आहे. काही प्रकरणांत पोलिसांनी नव्याकोऱ्या मोटारी संबंधितांच्या घरातून ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणल्या आहेत. त्यामुळे लाखो रुपयांची मोटार खरेदी करून रस्त्यावर रुबाब दाखवण्याचा प्रयत्न संबंधितांना महागात पडू लागला आहे.
नवीन वाहन खरेदीचा आनंद साजरा करण्यास कोणाचीही हरकत नाही. मात्र, त्यासाठी सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण करणे किंवा इतर नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका पोहोचवणे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. अशा रॅलींच्या व्हिडीओंची पडताळणी करून नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली जात आहे. वाहन कितीही महागडे असले तरी कायदा सर्वांसाठी समान आहे. वाहतूक नियम मोडणाऱ्यांची गय केली जाणार नाही.विक्रांत देशमुख, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा, पिंपरी-चिंचवड.