लोणावळा: लोणावळा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार याद्या अंतिम करण्याचे काम सुरू आहे. मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाला असून, अनेक नागरिकांची नावे वेगवेगळ्या प्रभागांमध्ये समाविष्ट झाली आहेत. एकाच कुटुंबात राहणाऱ्या चार व्यक्ती चार वेगवेगळ्या प्रभागांमध्ये गेले आहेत. जिवंत व्यक्तींच्या नावासमोर मयत असे दाखवण्यात आले आहे, तर लोणावळा शहराबाहेरील अनेक नावेही लोणावळा नगर परिषदेच्या मतदार याद्यांमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. (Latest Pimpri chinchwad News)
मतदार यादीमध्ये घोळ घालणाऱ्या प्रशासकीय अधिकारी व बीएलओ यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच या सदोष मतदार याद्यांची छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी होळी करत प्रशासनाचा व निवडणूक आयोगाच्या कारभाराचा निषेध नोंदवण्यात आला.
लोणावळा नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक पुढील दोन महिन्यांमध्ये होऊ घातली आहे. याकरिता मतदार याद्या अंतिम करण्याचे काम सध्या सुरू आहे. 17 ऑक्टोबर ही मतदार याद्यांवर सूचना व हरकत दाखल करण्याची अंतिम मुदत होती. मात्र अनेक ठिकाणी मतदार याद्यांमध्ये अद्यापही दुरुस्ती झालेली नाही. मतदार यादींची कामे करणारे अधिकारी हे कार्यालयामध्ये बसून मतदार याद्या निश्चित करत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये मतदार यादीमध्ये घोळ झाला आहे. अनेक नागरिकांची नावे ही वेगवेगळ्या प्रभागांमध्ये गेल्यामुळे त्यांनी मतदान करायचे कोठे व कसे असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
वर्षानुवर्ष एका विशिष्ट प्रभागामध्ये राहणाऱ्या नागरिकांची नावे अचानक दुसरा प्रभागामध्ये जातात कशी असा प्रश्न देखील यानिमित्त उपस्थित करण्यात आला आहे. लोणावळा नगर परिषदेचे प्रभाग क्रमांक आठ व प्रभाग क्रमांक नऊ हे दोन सदस्य संख्या असणारे आहेत, तर प्रभाग क्रमांक 13 हा तीन सदस्य संख्या असणार आहे असे असताना प्रभाग क्रमांक आठ व नऊ येथील मतदार संख्या ही प्रभाग क्रमांक 13 पेक्षा जास्त झाली आहे. प्रशासकीय अधिकारी व मतदार यादीमधील घोळ यामधून प्रखरतेने समोर येत आहे. जोपर्यंत मतदार यादीमधील हा घोळ दुरुस्त होत नाही तोपर्यंत अंतिम मतदार यादी निश्चित करू नये व मतदान घेण्याचेदेखील घाई करू नये, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
लोणावळा शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष नासिर शेख, प्रंतिक सदस्य यशवंत पायगुडे, जिल्हा सदस्य राजू बोराटे, प्रफुल्ल रजपूत, दत्ता गोसावी, संतोष कचरे, रवींद्र भोईने, पूजा दास गुप्ता यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी छत्रपती शिवाजी महाराज चौक याठिकाणी जमत त्यांनी प्रशासनाचा निषेध नोंदवत मतदार यादीची होळी केली आहे.