

पिंपळे निलख: क्षेत्रीय ड कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच रस्त्याला भलेमोठे भगदाड पडले आहे; परंतु क्षेत्रीय अधिकारी, स्थापत्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांना हे भगदाड दररोज दिसत असून याकडे डोळेझाक केली जात आहे. यामुळे येथून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसह स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. (Latest Pimpri chinchwad News)
या रस्त्यालगतच महादेव मंदिर असल्यामुळे महिला व लहान मुलांची सतत वर्दळ असते. तसेच सायकल मार्गावरून प्रवास करणारे सायकलस्वार यांनीदेखील वारंवार क्षेत्रीय कार्यालयाकडे तक्रार करूनदेखील अधिकारी व संबंधित विभाग दखल घेत नसल्याने ऐन सणासुदीत नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. भर रस्त्यात पडलेल्या भगदाडात पाय अडकून नागरिक जखमी होण्याची शक्यता आहे. रस्त्याला पडलेल्या भगदाडाखाली ड्रेनेज लाईन असल्याने सांडपाण्याचा उग््रावास परिसरात पसरत आहे.
मंदिरासमोर हे भगदाड फक्त अपघाताचा धोका निर्माण करत नाही, तर ये-जा करणाऱ्यांना दुर्गंधीमुळे त्रास होतो. विशेषतः लहान मुलं, महिला आणि वृद्ध मंडळींना ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागतो. प्रशासनाने तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करावी, अन्यथा येथे अपघात घडू शकतो, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
दररोज अधिकारी व कर्मचारी या मार्गावरून कार्यालयात ये-जा करतात. तरीही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. कार्यालयासमोरच रस्ता जर असुरक्षित असेल तर इतर भागातील नागरिकांच्या समस्या किती गंभीर असतील याचा विचारही करवत नाही. तातडीने या भगदाडाची दुरुस्ती केली नाही तर मोठा अपघात घडल्यास प्रशासन जबाबदार असेल. यामुळे अपघाताचा धोका, दुर्गंधी आणि आरोग्यविषयक समस्या वाढत आहेत. प्रशासनाने तातडीने लक्ष घालून दुरुस्तीचे काम करावे, अशी मागणी होत आहे.
सदर ठिकाणी पडलेल्या भगदाडाची आम्ही पाहणी करून तातडीने दुरुस्तीची प्रक्रिया सुरू करतो. नागरिकांची सुरक्षितता ही आमची प्राथमिक जबाबदारी आहे. ड्रेनेजलाईनमुळे झालेल्या नुकसानाची दुरुस्ती करून रस्ता लवकरच पूर्ववत केला जाईल.
बापूसाहेब गायकवाड, सहशहर अभियंता, शहरी दळणवळण विभाग