Lonavala Traffic Jam Pudhari
पिंपरी चिंचवड

Lonavala Traffic Jam: लोणावळ्यात वीकेंडची वाहतूक कोंडी ठरली कायमची डोकेदुखी; अंतर्गत रस्तेही जाम

नांगरगाव-भांगरवाडी रेल्वे गेट परिसरात वाहनांच्या रांगा; मॅप्रो गार्डन, अपूर्ण उड्डाणपूल आणि पार्किंगअभावी कोंडीत भर

पुढारी वृत्तसेवा

लोणावळा: शनिवार, रविवार सुटी व लोणावळा शहरातील वाहतूक कोंडी हे एक न सुटणारे कोडे आहे. 15 ऑगस्टच्या वीकेंडनंतर लोणावळा शहरातील वाहतूक कोंडी व पर्यटक संख्या यामध्ये घट होते, असे काही जाणकार सांगतात. मात्र, आजच्या शनिवार, रविवारी झालेली वाहतूक कोंडी पाहून वीकेंड व वाहतूक कोंडी हे चित्र कायमच पाहायला मिळणार, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

अनेक पर्यटक हे गुगल मॅपचा वापर करत वेगवेगळ्या रस्त्याने लोणावळा शहरामध्ये येण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे नांगरगाव ते भांगरवाडी रेल्वे गेटच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागत आहेत. पर्यटकांच्या या वाहनांमुळे दोन्ही बाजूला काही मीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा जात असल्यामुळे या भागातून प्रवास करणारे स्थानिक नागरिक, शाळेचे विद्यार्थी, सायकली घेऊन जाणारी लहान मुले, वयस्कर नागरिक, महिला या सर्वांना या वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. लोणावळा शहरातून जाणाऱ्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर शनिवार, रविवारप्रमाणेच आठवड्याचे सातही दिवस वाहनांच्या रांगा लागत असतात. आता शहरातील अंतर्गत रस्त्यांवरदेखील वाहतूक कोंडी सातत्याने होऊ लागली आहे.

मॅप्रो गार्डनमुळे वाहतूक कोंडीत भर

मावळा पुतळा चौक ते रायवूड याबाबत सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. वलवण गावात मॅप्रो गार्डनमुळे वाहतूक कोंडी होत आहे; तसेच मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर साधारण दीड ते दोन किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागत आहेत. लोणावळा शहरातदेखील असे अनेक नवीन स्पॉट तयार झाले आहेत, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊ लागली आहे.

पुणे-मुंबई महामार्ग रुंदीकरणाचा प्रश्न रखडला

मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण मागील अनेक वर्षांपासून रखडले आहे. शहरातील वाहतूक कोंडीची समस्या ही सर्वश्रुत असते तरी ती सोडविण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना होत नाही. रस्ता रुंदी करण्याचे कोणतेही प्रस्ताव व अंमलबजावणी होताना दिसत नाही. तसेच शहरामध्ये येणाऱ्या पर्यटकांची वाहने उभी करण्यासाठी कोठेही वाहनतळाची सुविधा आजपर्यंत लोणावळा नगर परिषदेने उपलब्ध केलेली नाही. नगर परिषदेच्या या नियोजनशून्य व अपयशी कारभाराचा फटका आज शहरातील प्रत्येक नागरिकाला बसत आहे.

कोंडी फोडण्यासाठी उड्डाण पुलाचे नियोजन

लोणावळा शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी 2019 या वर्षामध्ये नांगरगाव ते भांगरवाडीदरम्यान रेल्वे उड्डाण पूल कामाला सुरुवात करण्यात आली. मात्र, कामाचे कोणतेही नियोजन न करता सुरू केलेले हे काम सात वर्षांनंतरही अपूर्णच आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्या या बेजबाबदारपणाचा फटका नागरिकांना बसत आहे.

पोलिस प्रशासनाची बघ्याची भूमिका

नवनवीन ठिकाणी वाहतूक कोंडी होत असताना पोलिस प्रशासनाचा व लोणावळा नगर परिषदेचा यावर कोणताही अंकुश राहिलेला नाही. व्यावसायिकदेखील व्यवसाय करत असताना पर्यटक वाहनांना वाहने उभी करण्यासाठी कुठेही जागा योग्य प्रकारे उपलब्ध करून देत नाहीत. केवळ आर्थिक नफा कमवणे हाच या व्यावसायिकांचा उद्देश असल्याचे दिसून येत आहे. त्यावर महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणतीही यंत्रणा याची दखल घेत नाही. या सर्व गोष्टींचा नाहक त्रास हा सर्वसामान्य नागरिकांना भोगावा लागत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT