लोणावळा: शहरामध्ये दिवसेंदिवस वाढत असलेली वाहतूक कोंडी ही सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच आता पोलिस प्रशासनासाठीसुद्धा मोठी डोकेदुखी ठरू लागली आहे. लोणावळा शहरातील नवीन पोलिस ठाण्यासमोर दैनंदिन मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊ लागल्यामुळे ती सोडवण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर असणार आहे.
उपाययोजनांचा अभाव
शहराचा भौगोलिकदृष्ट्या विचार करता शहरातील भविष्यातील कोंडीची समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून कोणत्याही उपाययोजना लोणावळा नगर परिषदेकडून करण्यात आलेल्या नाहीत. याचा फटका दिवसेंदिवस सर्वसामान्य नागरिकांना बसू लागला आहे. मागील 25 ते 30 वर्षांमध्ये एकही रेल्वेचा नवीन उड्डाणपूल या शहरामध्ये झालेला नाही. कोणतेही नवीन रस्ते तयार झालेले नाहीत. दिवसेंदिवस रस्त्यांची रुंदी ही कमी होऊ लागली आहे. त्यावर कोणताही अंकुश लोणावळा नगर परिषदेचा राहिलेला नसल्याचे दिसत आहे.
पर्यटनावर परिणाम
शनिवार, रविवारप्रमाणेच आठवड्याचे सातही दिवस लोणावळा शहरामध्ये वाहतूक कोंडीची समस्या जाणवू लागली आहे. मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गासह मावळा पुतळा चौक, जयचंद चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, भांगरवाडी, भांगरवाडी रेल्वे गेट, रायवूड परिसर, बसस्थानकाचा परिसर या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.
वाहतूक कोंडीची ही समस्या सोडवण्यासाठी लोणावळा शहर पोलिस व लोणावळा नगर परिषद यांना एकत्रित रित्या काम करावे लागणार आहे. शहरातील वाहतूक कोंडीमुळे पर्यटक त्रस्त झाले आहेत. याचा परिणाम आता पर्यटनावरही हाेऊ लागला आहे.
स्थानिक नागरिक त्रस्त
मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ व आयआरबी या संस्थांनादेखील सोबत घ्यावे लागणार आहे. वाहतूक कोंडीबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करणे त्यांना शिस्त लावण्यासोबतच काही दंडात्मक कारवाईदेखील या पुढील काळामध्ये करावी लागणार आहे. लोणावळा शहरातील ही वाहतूक कोंडी स्थानिकांसोबतच पर्यटक व येथील व्यावसायिकांनादेखील त्रासदायक ठरू लागली आहे.