Lonavala Tourist Crowd Pudhari
पिंपरी चिंचवड

Lonavala Tourist Crowd: लोणावळा हाऊसफुल्ल! भुशी धरणावर पाय ठेवायलाही जागा नाही; पर्यटनस्थळांवर तुफान गर्दी

साप्ताहिक सुटीला हजारो पर्यटकांची लाट; १८० पोलिसांचा बंदोबस्त, वाहतूक कोंडीने स्थानिकांची गैरसोय

पुढारी वृत्तसेवा

लोणावळा: शनिवार व रविवारच्या साप्ताहिक सुटीमुळे दोन दिवस लोणावळा परिसरात मोठ्या संख्येने पर्यटक आले होते. यामुळे शहर व आजूबाजूचा ग्रामीण परिसर हाऊसफुल्ल झाला होता. शहरातील भुशी धरणावर तर अक्षरशः पाय ठेवण्यास देखील जागा नव्हती. तुंगार्ली धरणावर देखील पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. लोणावळा शहर व ग्रामीण भागातील सर्वच पर्यटनस्थळे पर्यटकांच्या गर्दीमुळे तुडुंब भरली होती.

लायन्स पॉईंट, शिवलिंग पॉईंट याठिकाणीदेखील हजारो पर्यटक आले होते. खंडाळ्यातील राजमाची गार्डन, ड्युक्स नोज पॉइंट, आई एकवीरा देवी मंदिर परिसर, भाजे लेणी, लोहगड किल्ला, सहारा पुलासमोरील धबधबा येथे पर्यटकांची तोबा गर्दी झाली होती. शहरात 15 ऑगस्टच्या दिवशी व रविवारी होणारी पर्यटकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता मोठा पोलिस बंदोबस्त शहरात व पर्यटनस्थळांवर तैनात करण्यात आला होता. मुख्यालयातून आलेले व स्थानिक पोलिस ठाण्याचे असे 180 पोलिस कर्मचारी व अधिकारी बंदोबस्त कामी नियुक्त करण्यात आले होते.

मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात

लोणावळा शहरामध्ये निर्माण झालेली कोंडी सुरळीत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस रस्त्यावर तैनात होते. मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागून सुद्धा वाहने थांबून राहत नव्हती. हळूहळू वाहने पुढे सरकत होती. 15 ऑगस्ट रोजी दुपारी भुशी धरण भागात झालेली गर्दी लक्षात घेता पोलिस प्रशासनाकडून रायवूड येथे सायंकाळी 4 नंतर धरणाकडे जाणारी वाहने बंद करण्यात आली होती. सायंकाळीनंतर धरणाकडून येणाऱ्या वाहनांची मोठी रांग लागली होती.

घराबाहेर पडणे मुश्कील

रविवारी सकाळी आठ वाजल्यापासूनच भुशी धरणावर पर्यटकांची गर्दी झाली होती. हलक्या स्वरूपात पडणारा पाऊस व धरणाच्या पायऱ्यांवरून झुळुझुळू वाहणार्या पाण्यात बसून पर्यटक भिजण्याचा आनंद घेत होते. दोन्ही दिवस मोठ्या संख्येने पर्यटक आल्याने स्थानिक नागरिकांच्या व्यवसायालादेखील मोठी चालना मिळाली. अगदी हातगाडीवर चहा, मक्याचे कणीस, वडापाव, भजी विक्री करणाऱ्यांपासून मोठ्या हॉटेल व रिसॉर्ट तसेच चिक्की दुकाने, खासगी बंगले या सर्वांनी समाधान व्यक्त केले आहे. पर्यटक वाहनांमुळे व गर्दीमुळे मात्र सर्वसामान्य नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले होते.

वाहनतळाची गरज

लोणावळा शहरात पर्यटक वर्षभर येत असतात. येणाऱ्या पर्यटकांना चांगल्या सुविधा देण्यासोबतच स्थानिक नागरिकांची गैरसोय होणार नाही या दृष्टिकोनातून स्थानिक लोणावळा नगर परिषद, जिल्हा प्रशासन व शासनाच्या वतीने योग्य उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT