लोणावळा: लोणावळा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीतील उर्वरित प्रभाग क्रमांक पाच आणि 10 प्रभागातील दोन जागांसाठी शनिवारी मतदान शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. लोणावळ्यात दोन जागांसाठी आज 70.02 टक्के मतदान झाले. आता सर्व जागांचा निकाल रविवारी (दि. 21) सकाळच्या सत्रात लागणार असल्याने सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. तसेच, चर्चा व तर तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
नांगरगावात 76 तर गवळीवाड्यात 63.65 टक्के मतदान
लोणावळा नगर परिषदेच्या एकूण 27 जागांपैकी यापूर्वीच तीन जागा बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित 22 जागांसाठी दोन डिसेंबरला मतदान प्रक्रिया पार पडली होती. मात्र, दोन प्रभागांतील जागांसाठी काही कारणांमुळे निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. त्यानुसार शनिवारी गवळीवाडा प्रभाग क्रमांक 10 अ (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला) आणि नांगरगाव प्रभाग क्रमांक 5 ब (सर्वसाधारण) या दोन जागांसाठी मतदान घेण्यात आले. प्रभाग क्रमांक पाच नांगरगाव याठिकाणी 76.17 टक्के मतदान झाले. तर्रें प्रभाग क्रमांक 10 गवळीवाडा याठिकाणी 63.65 टक्के मतदान झाले.
चोख पोलिस बंदोबस्त
नांगरगाव प्रभागासाठी रेल्वे ज्ञानदीप्ती स्कूल, लोणावळा नगर परिषद लोकमान्य टिळक विद्यालय तसेच नांगरगाव अग्निशमन केंद्र येथे मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. तर, गवळीवाडा प्रभागात गवळीवाडा शाळा क्रमांक सहा, पुणे वन विभागाचे विश्रामगृह (खंडाळा) आणि व्ही. पी. एस. हायस्कूल, लोणावळा येथे मतदानाची व्यवस्था करण्यात आली होती. गवळीवाडा प्रभागात भाजप आणि काँग््रेास यांच्यात सरळ लढत पाहायला मिळाली. तर, नांगरगाव प्रभागात भाजप, राष्ट्रवादी काँग््रेास आणि एका अपक्ष उमेदवारासह तिरंगी लढत रंगली. विशेषतः नांगरगावमध्ये प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मोठी चुरशीने मतदान झाले. मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पडावी यासाठी प्रशासनाच्यावतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. एकूणच मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडली.
तळेगावातील 11 जणांचे भवितव्य इव्हीएममध्ये कैद
सोमाटणे: तळेगाव नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी अखेरच्या टप्प्यातील मतदान शनिवारी पार पडले. नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक दोन, सात, आठ आणि दहामधील नगरसेवक पदाच्या 5 जागांसाठी हे मतदान पार पडले. तळेगावात 57.43 टक्के मतदान झाले. या 5 जागांसाठी एकूण 11 उमेदवार रिंगणात होते. तळेगाव येथील 20 मतदान केंद्रावर निवडणूक प्रक्रिया काही किरकोळ वाद वगळता शांततेत पार पडली. या 5 जागांसाठी दुपारी दीड वाजेपर्यंत 35.86 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रसिद्ध पत्रकाद्वारे देण्यात आली. तर, दिवस अखेर 57.43 टक्के मतदान झाले आहे.
मतदारांना गृहीत धरून झालेले 19 बिनविरोध नगरसेवक, 6 जागांसाठी ऐनवेळी मिळालेली स्थगिती, मतदार याद्या व प्रभागांमधील गोंधळ या सर्व पार्श्वभूमीवर मतदानाचा टक्का घसरल्याचे चित्र पाहायला मिळाले. नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासह 3 प्रभागांतील 4 जागांसाठी 49.25 टक्के मतदान झाले होते. तर, 4 प्रभागांतील 5 जागांसाठी 57.43 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.