Lonavala Smart Meter Protest Pudhari
पिंपरी चिंचवड

Lonavala Smart Meter Protest: लोणावळ्यात स्मार्ट मीटरवरून मोठा वाद; सर्वपक्षीय आंदोलन, गुन्हे दाखल

वीज वितरणच्या मनमानीविरोधात संताप; स्मार्ट मीटर सक्तीवरून राजकीय संघर्ष तीव्र

पुढारी वृत्तसेवा

लोणावळा: महाराष्ट्र वीज वितरण कार्यालयाच्या वतीने लोणावळा शहरामध्ये वीजग्राहकांची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता मनमानी पद्धतीने व धाक दडपशाहीने जुने मीटर बदलून त्या ठिकाणी स्मार्ट मीटर लावले जात आहेत. वीज वितरण कार्यालयाच्या या धाक दडपशाहीच्या विरोधामध्ये सोमवारी वीज वितरण कार्यालयाच्या विरोधामध्ये भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस व मनसे या पक्षांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनानंतर रात्री उशिरा मनसेचे लोणावळा शहराध्यक्ष निखिल भोसले, मावळ तालुका उपाध्यक्ष अमित भोसले व शहर उपाध्यक्ष दिनेश कालेकर यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याच्या कारणावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सर्वसामान्य नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर आंदोलन केल्याप्रकरणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्याची माहिती शहरात समजल्यानंतर आज लोणावळा शहरातील सर्व राजकीय पक्षांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी एकत्र जमत मनसे पदाधिकाऱ्यांवर दाखल गुन्ह्यांचा निषेध नोंदवत तातडीने हे गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशी मागणी केली.

तसेच वीजग्राहकांची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता त्यांच्या घरामध्ये घुसून तसेच तळमजल्यावर कोणतीही परवानगी न घेता परस्पर मीटर बदलल्याप्रकरणी संबंधित ग्राहकांच्या तक्रारी स्वीकारत वीज वितरणच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी या वेळी पदाधिकाऱ्यांनी केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबतच, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या सर्व पक्ष्यांनी एकत्र जमत मनसे पदाधिकाऱ्यांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या घटनेचा निषेध नोंदवला.

या वेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मच्छिंद्र खराडे, माझी उपनगराध्यक्ष नारायण पाळेकर, शिवसेनेच्या पुणे जिल्हा सहसंपर्कप्रमुख शादान चौधरी, नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष देविदास कडू, भाजपाचे माजी नगरसेवक बाळासाहेब जाधव, माजी शहराध्यक्ष अरुण लाड, नगरसेवक निखिल कवीश्वर, जीवन गायकवाड, नगरसेवक धनंजय काळोखे, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राजू गवळी, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष नासिर शेख, प्रांतिक सदस्य बाळासाहेब पायगुडे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष कमलशिल मस्के, मनसेचे मावळ तालुका अध्यक्ष अशोक कुटे, जिल्हा उपाध्यक्ष सचिन भांडवलकर, माजी नगरसेवक अशोक मावकर, राजू बोराटे, नगरसेविका दीपा अग्रवाल, नगरसेविका सना चौधरी, अर्जुन पाठारे, रवी सलोजा, वसंतराव भांगरे, मनसे शहराध्यक्ष निखिल भोसले, मावळ तालुका उपाध्यक्ष अमित भोसले, दिलीप देशपांडे, संजय कांबळे यांच्यासह नागरिक व विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

महावितरणचे वीजसमस्यांकडे दुर्लक्ष

शहरामध्ये वीज वितरण कार्यालयाचा अनागोंदी कारभार व मनमानी कारभार सुरू आहे. सातत्याने शहरामध्ये वीज जात आहे, शहरातील मुख्य रस्त्यांवर तसेच आजूबाजूच्या रस्त्यांवर विजेच्या तारा रस्त्यावर लोंबकळत आहेत, दररोज तासंतास वीज गायब होत आहे, असा प्रकार सातत्याने घडत असताना त्याकडे लक्ष न देता वीज वितरणचे अधिकारी हे ठेकेदारांच्या मदतीने नागरिकांच्या घराचे मीटर बदलून त्या ठिकाणी स्मार्ट मीटर लावण्याचा घाट घालत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मार्ट मीटरची सक्ती नसल्याबाबतचे जाहीर केल्यानंतरदेखील वीज वितरणचे अधिकारी व त्यांचे ठेकेदार हे ग्राहकांना धाक दडपशाहीच दाखवत त्यांचे मीटर बदलत असल्याच्या तक्रारी या वेळी करण्यात आल्या.

मीटरसाठी ग्राहकांची परवानगी आवश्यक

वीजग्राहकांची परवानगी घेतल्याशिवाय शहरामध्ये तसेच ग्रामीण भागामध्ये कोठेही स्मार्ट मीटर लावू दिले जाणार नाही, असा पवित्रा या वेळी सर्वपक्षीय नेत्यांनी घेतला आहे. महाराष्ट्र वीज वितरण कार्यालयाने ही मनमानी न थांबवल्यास लोणावळा शहर बंद करत वीज वितरण कार्यालयाचा निषेध नोंदवला जाईल. त्यानंतर निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेला वीज वितरणचे अधिकारी हेच जबाबदार राहतील, असेदेखील या वेळी सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT