लोणावळा: वीज वितरण कार्यालयाकडून वीजग्राहकांना कोणतीही कल्पना न देता परस्पर त्यांच्या घराचे व सोसायटीचे लाईट मीटर बदलून त्या ठिकाणी नवीन स्मार्ट मीटर लावण्यात आले आहेत. लोणावळा शहरामध्ये स्मार्ट मीटर लावण्याच्या सक्तीवरून राजकीय पक्ष आक्रमक झाले आहेत.
मागील काही दिवसांपासून वीज वितरण कार्यालयाच्या ठेकेदारांकडून ग्राहकांना कोणतीही कल्पना न देता परस्पर मीटर बदलले जात आहेत. नवीन मीटरचा भार हा अधिक असून, दोन ते तीन पट वीजबिल येत असल्याचे ग्राहक सांगत आहेत. वीज वितरण कार्यालयाची ही मनमानी सहन केले जाणार नाही. वेळ पडली तर वीज वितरणच्या या भोंगळ व मनमानी कारभाराच्या विरोधामध्ये लोणावळा शहर बंदचा इशारादेखील देण्यात आला आहे. वीज वितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन याबाबतचे स्पष्टीकरण द्यावे व वीस ग्राहकांच्या संमतीशिवाय कोणतेही मीटर लावण्याची सक्ती करू नये, अशी मागणी या सर्वपक्षीयांनी केली आहे.
लोणावळा भाजपाचे ठिय्या आंदोलन
भारतीय जनता पार्टीच्या वतीने नांगरगाव येथील वीज वितरण कार्यालयावर आज ठिय्या मोर्चा काढण्यात आला. लोणावळा शहरामध्ये एमएसईबीच्या अनेक तक्रारी आहेत. वारंवार लाईट जाण्याच्या समस्या आहेत. मात्र या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करत एमएसईबीने वीजग्राहकांचे परस्पर मीटर बदलून त्या ठिकाणी स्मार्ट मीटर लावण्याचा तडाका लावला आहे. वीजग्राहकाला याबाबत कोणतीही पूर्वकल्पना दिली जात नाही व त्यांची संमती न घेता मनमानीपणाने हा कार्यक्रम चालू आहे. याविरोधात भाजपाने वीज वितरणचे कार्यालयाचे अधिकारी आरगडे यांची चांगलीच कानउघडणी केली. जोपर्यंत ग्राहकाचे संमती भेटत नाही, तोपर्यंत स्मार्ट मीटर लावायचे नाहीत, अशी सक्त ताकीद दिली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मार्ट मीटर लावण्याबाबत कोणतीही सक्ती करू नये, असे सांगितले असतानादेखील वीज वितरणकडून मनमानीपणाने हे मीटर लावले जात आहेत. अखेर वीज वितरण अधिकारी आरगडे यांनी वरिष्ठांशी चर्चा करून भाजपाला वीजग्राहकांची संमती घेतल्याशिवाय मीटर बदलणार नाही, असे लेखी दिल्यानंतर भाजपाने हे ठिय्या आंदोलन स्थगित केले.
मनसेने कार्यालयाला ठोकले कुलूप
भाजपाचे आंदोलन सुरू असतानाच त्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने स्मार्ट मीटरसक्तीविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. अधिकाऱ्यांकडून कोणतेही समाधानकारक उत्तर भेटत नव्हते. वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेऊ एवढेच उत्तर त्यांच्याकडून मिळत असल्याने अखेर मनसेने लोणावळा वीज वितरण कार्यालयाचे अधिकारी आरगडे व इतर सर्व सहाय्यक कर्मचारी व अधिकारी यांना कार्यालयाबाहेर काढत कार्यालयाला टाळे लावले. जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी येत नाहीत व लोणावळा शहरामध्ये मनमानी पद्धतीने सुरू असलेली स्मार्ट मीटर लावण्याची प्रक्रिया बंद होत नाही, तोपर्यंत कार्यालयाचे टाळे काढले जाणार नाही असे सांगत चावी पोलिसांकडे जमा केली. मनसेच्या या आक्रमक पवित्र्यामुळे वीज वितरण कार्यालयाचे अधिकारी यांनी वरिष्ठांचे चर्चा करून वीजग्राहकांचे संमती घेतल्याशिवाय स्मार्ट मीटर लावणार नाही, असे सांगितले. या वेळी मनसेच्या कार्यकर्त्यांकडून काही मीटरदेखील फोडण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसने अधिकाऱ्यांना उन्हात केले उभे
लोणावळा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडूनदेखील स्मार्ट मीटर सक्तीच्या विरोधामध्ये याचवेळी वीज वितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. वीज वितरणचे अधिकारी ग्राहकांशी योग्य प्रकारे बोलत नाहीत. मनमानीपणाने कोणालाही पूर्वकल्पना न देता परस्पर घरांचे व सोसायटीचे मीटर बदलून त्या ठिकाणी स्मार्ट मीटर लावत आहेत याचा निषेध म्हणून त्यांनी वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना कार्यालयातून बाहेर काढत उन्हामध्ये उभे केले. शहरामध्ये वीज वितरण कार्यालयाच्या विरोधामध्ये प्रचंड असंतोष नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. एकीकडे वारंवार वीज जात आहे दुसरीकडे मेंटेनन्सच्या नावाखाली वृक्षतोड केले जात आहे. या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष होत असताना स्मार्ट मीटर सक्ती मात्र कोणाची परवानगी न घेता केली जात आहे. वीज वितरण कार्यालयाने ही मनमानी व भोंगळ कारभार ताबडतोब थांबवावा व वीजग्राहकांची परवानगी असल्याशिवाय कोणाचाही मीटर बदलला जाऊ नये, अन्यथा वीज वितरण कार्यालयाच्या विरोधामध्ये जन आक्रोश आंदोलन करण्याचा इशारा या सर्व राजकीय पक्षांच्या वतीने देण्यात आला आहे.