लोणावळा: मुंबई व पुणे या दोन शहराच्या मध्यभागावर असलेल्या व जागतिक नकाशावर थंड हवेचे ठिकाण, पर्यटनस्थळ अशी ओळख असलेल्या लोणावळा व ग्रामीण परिसरातील अनेक जमिनी, जुने बंगले, रिकाम्या मोकळ्या जागा बळकवण्यासाठी, त्यावर ताबे घेण्यासाठी काही टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. यामध्ये गुंड प्रवृत्तीचा मोठ्या प्रमाणात शिरकाव झाला आहे. तसेच, अनेक प्रकरणांमध्ये राजकीय हस्तक्षेपदेखील होऊ लागल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नुकतीच शहरातील रायवूड भागात लाल चिमणी नावाच्या बंगल्यावर बेकायदेशीररित्या ताबा मिळवण्याचा प्रयत्न शहरातील लोकप्रतिनिधी व पोलिस यांच्या ठोस कारवाईमुळे नागपंचमीच्या दिवशी हाणून पाडला गेला. मात्र, याच बंगल्याच्या शेजारी असलेल्या एका बंगल्यावर याच टोळीने तीन महिन्यांपूर्वी बेकायदेशी रित्या ताबा घेतला आहे. लोणावळा शहर हे ब्रिटिश काळात वसलेले व्यापारी शहर आहे. या ठिकाणी खंडाळा, जुना खंडाळा, रायवूड, भुशी, तुंगार्ली, अंबरवाडी या भागांमध्ये जुन्या मालमत्ता आहेत.
अनेक मुंबईमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या पूर्वजांनी या मालमत्ता घेतल्या आहेत. तसेच, अनेक जण हे भारताबाहेरदेखील राहतात. त्यामुळे अनेक मालमत्ता या मूळ मालकापासून दुर्लक्षित राहिल्या आहेत. शहरातील जुन्या मालमत्तांचे रक्षण करण्याचे काम शहरातील काही स्थानिक नागरिक मागील काही वर्षांपासून अथवा काही पिढ्यांपासून करत आहेत. कालांतराने आता त्या जागा जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे या जागा, जमिनी खरेदी करण्याकडे काही बड्या धेंड्यांचे लक्ष गेले आहे. अनेक मोठे राजकीय लोकदेखील यामध्ये मध्यस्थीची भूमिका बजावत आहेत किंवा हस्ते परहस्ते सदरच्या जागा मिळवण्याचा प्रयत्नदेखील करत आहेत.
दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी
लोणावळा शहर हे पर्यटनस्थळ असल्यामुळे या शहरामध्ये अशा शेकडो मालमत्ता आहेत. ज्याचे रक्षण करण्याचे काम आजूबाजूच्या ग्रामीण भागातील गरीब कुटुंब इमाने इतबारे करत आहेत. त्या कुटुंबांच्या दोन, तीन, चार पिढ्या या मालमत्तांचे रक्षण व संगोपन करण्यात खपल्या आहेत. अशा कुटुंबांना त्यांचा कायदेशीर हक्क अथवा कायदेशीर मोबदला न देता गुन्हेगारांना हाताशी धरून जागेचे ताबे मिळवले जात आहेत.
बारा तासांनंतर गुन्हा दाखल
17 ऑगस्ट रोजी शहरामध्ये घडलेला प्रकार अतिशय भयंकर होता. जागेचा ताबा घेण्यासाठी महिला बाउन्सरचा वापर करण्यात आला. अतिशय अर्वाच्य व शिवराळ भाषा वापरत या महिला माळी काम करणाऱ्या नागरिकांना घराबाहेर काढत होत्या. या घटनेचा संताप शहरामध्ये निर्माण झाला. नगराध्यक्ष व नगरसेवक यांनी पोलिस ठाण्यामध्ये जाऊन कायदेशीर कारवाई करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मात्र, हा गुन्हा दाखल होण्यास बारा तास लागले होते.
गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टोळ्या सक्रिय
यामधूनच खरंतर लोणावळा शहरामध्ये जागेचा ताबा मिळवणाऱ्या टोळ्या सक्रिय होऊ लागल्या आहेत. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टोळ्यांना हाताशी धरत सर्वसामान्य माळी व केअर टेकर यांच्यावर दबाव आणत, त्यांना दमदाटी करत, मारहाण करत बेकायदेशीररित्या त्यांना मालमत्तांमधून हद्दपार करत ताबा घेऊन दिला जात आहे. कोट्यवधी रुपयांची उलाढाल यामध्ये होत असल्याची चर्चा शहरामध्ये आहे. याकरिता कायदेशीर मार्गाचा वापर न करता दहशत निर्माण करून बेकायदेशीरपणे जागा खाली करून घेतल्या जात आहेत. संबंधित टोळ्या या गुन्हेगारी क्षेत्राशी निगडित तसेच राजकीय वरदस्त लाभलेल्या असल्यामुळे त्यांना विरोध करण्याचे धाडस सर्वसामान्य नागरिक करत नाहीत. पोलिस प्रशासनाकडूनदेखील यावर कोणतेही कठोर कारवाई होत नाही. त्यामुळे बाहेरच्या नागरिकांचा इंटरेस्ट शहरामध्ये वाढला आहे. काही स्थानिक एजंटदेखील यामध्ये सहभागी असल्याची चर्चा रंगत आहे.