Uran Power Cut pudhari photo
पिंपरी चिंचवड

Lonavala Power Outage: लोणावळा दोन दिवस अंधारात! मुसळधार पावसामुळे शहराचा वीजपुरवठा ठप्प, नागरिकांची मोठी गैरसोय

डीपी बॉक्स पाण्याखाली गेल्याने वीजपुरवठा खंडित; मोबाईल नेटवर्कही बंद, पुरग्रस्त भागांत बचावकार्य सुरू

पुढारी वृत्तसेवा

लोणावळा: मुसळधार पावसामुळे संपूर्ण शहरातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. ६ जुलै रोजी सायंकाळपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. मंगळवारी 7 जुलै रोजी अधून मधून पावसाच्या सरी येत होत्या. मात्र, तरीदेखील लोणावळा शहराचा वीजपुरवठा बंद राहिल्याने नागरिकांना दोन दिवसांपासून अंधारात राहण्याची वेळ आली आहे. प्रत्येक जण लाईट केव्हा येणार, अशी विचारणा करत आहे. मात्र, कोणालाही समाधानकारक उत्तर मिळत नव्हते. त्यातच मोबाईल फोनचे नेटवर्कदेखील बंद झाल्याने नागरिकांचा संपर्कदेखील तुटला होता.

मुसळधार पावसामुळे शहरातील बहुतांश भागाला पुराचा विळखा बसला आहे. बाजारभागातील हुडको कॉलनी, इंद्रायणीनगर, कैलासनगर, महाडा कॉलनी, भांगरवाडीचा काही भाग, नांगरगावातील आदर्श कॉलनी, जाधव कॉलनी, सुरय्या सोसायटी, इंद्रायणी सोसायटी, नक्षत्र सोसायटी तसेच आगवाला चाळकडे जाणारा रस्ता, चर्च समोरील रस्ता हा भाग मंडळवारीदेखील पाण्याखाली होता.

हुडको कॉलनी, इंद्रायणीनगर, कैलासनगर, महाडा या भागातील नागरिकांना घरातून बाहेर काढण्याचे काम दोन दिवसांपासून सुरू आहे. हे सुरू असताना रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणीच असल्याने एमएसईबीचे डीपी बॉक्स पाण्यात गेल्यामुळे संपूर्ण शहराचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. अनेक भागांमध्ये पाणी पसरले मात्र लाईट काही आली नाही. काही ठिकाणी झाडे पडल्यामुळे तर बहुतांश ठिकाणी डीपी पाण्यामध्ये गेल्यामुळे वीजपुरवठा सुरळीत केला नसल्याचे सांगितले जात आहे.

लाईट नसल्याने नागरिक त्रस्त

लाईट नसल्यामुळे नागरिकांना घरामध्ये पिण्याच्या पाण्याची व इतर पाण्याचीदेखील मोठी अडचण निर्माण झाली आहे. आकाशातून धोधो पाऊस कोसळत असला तरी घरामध्ये नागरिकांना लाईट नसल्यामुळे पिण्यासाठी पाणी नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. महाराष्ट्र वीज वितरण कंपनीने या सर्व गोष्टींचा विचार करावा. जमिनीच्या लेवलला बसवण्यात आलेले डीपी बॉक्स यांना भविष्यात उंच ठिकाणी बसवावे व वीजपुरवठा अखंडित राहील याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT