लोणावळा: लोणावळा शहरामध्ये विविध राजकीय पक्षांना एकत्र घेत शहर परिवर्तन विकास आघाडी तयार करत निवडणूक लढविण्यासाठी मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांनी प्रयत्न केले. मात्र, जागावाटपाचा तिढा अखेरच्या क्षणापर्यंत न सुटल्याने व परिवर्तन विकास आघाडीलादेखील एक सारखे चिन्ह मिळण्याची शक्यता धूसर होऊ लागल्याने सर्वच राजकीय पक्षांनी या परिवर्तनमधून काढता पाय घेतला. त्यामुळे लोणावळा शहरातील ही परिवर्तन विकास आघाडी उदयास येण्यापूर्वीच मावळल्याने परिवर्तन विकास आघाडीचे अवस्था टांगा पलटी, घोडे फरार अशी झाली आहे.
विधानसभा निवडणुकीमध्ये लोणावळा शहराने आमदार सुनील शेळके यांना मोठे मताधिक्य मिळवून दिले. या विजयाचे अनेक जण शिल्पकार झाल्याने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या अपेक्षादेखील त्याच प्रमाणात वाढल्या. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांमधील लोकांना एकत्र घेऊन निवडणुकीला सामोरे जाण्याचा प्रयत्न आमदार शेळके यांनी केला. प्रत्यक्षात हा प्रयोग शक्य नसला तरी मागील महिनाभरापासून या चर्चेचे गुराळ सुरू होते. तरीदेखील कोणताही निर्णय होत नव्हता.
सर्वच राजकीय पक्षांचे प्रमुख पदाधिकारी हे रोज चपला झिजवत होते, हेलपाटे मारत होते, बैठकांवर बैठका होत होत्या. तरी त्यांच्या पदरात काहीच पडत नव्हते. त्यातच अनेकांना शब्द दिल्याने इच्छुकांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ येऊन ठेपली तरी उमेदवारी मिळणार की नाही, समाधानकारक जागावाटप होणार की नाही, असे अनेक प्रश्न निर्माण होऊ लागल्यामुळे लोणावळा शहरामध्ये निर्माण झालेल्या या परिवर्तन विकास आघाडीमधून एक एक राजकीय पक्षाने पाय काढून घेण्यास सुरुवात केली. याचा फायदा घेत भाजपने मास्टर स्ट्रोक मारत पहिली उमेदवारी जाहीर करत अनेक मातब्बरांना पक्षाकडून अधिकृत उमेदवारी दिल्याने परिवर्तन
विकास आघाडी डळमळीत झाली
लोणावळा परिवर्तन विकास आघाडीची मदार ज्या काही प्रमुख चेहऱ्यांवर होती, असेच चेहरे भाजपाकडून उमेदवार झाले तर काँग्रेस पक्षाने आपल्या पंजा याच चिन्हावर निवडणुका लढवण्याचे ठाम मत व्यक्त केले. परिवर्तन विकास आघाडी करूनदेखील परिवर्तन होण्याची चिन्हे दिसत नसल्याने काही राजकीय पक्षांनी स्वबळावर निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला. काहींनी समाधानकारक जागावाटप होत नसल्याने परिवर्तनातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने सर्वांना सोबत घेऊन चालण्याची खेळी ही आमदार शेळके यांना यशस्वी करता न आल्याने सरते शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार हा एकच पक्ष परिवर्तनामध्ये शिल्लक राहिला, बाकी सर्वांनीच परिवर्तनाकडे पाठ फिरवत, आम्ही जसे आहोत तसेच ठीक आहोत, असे म्हणत स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे या परिवर्तन विकास आघाडीची अवस्था टांगा पलटी, घोडे फरार अशीच झाली आहे.
नावे जाहीर करण्यात दिरंगाई
परिवर्तन विकास आघाडीची तयारी करत असताना आमदार शेळके यांनी लोणावळा शहरातील प्रभागांमध्ये जनतेचा कौल जाणून घेत सर्वसमावेशक चेहऱ्यांची नावे जाहीर करण्यात आघाडी घेतली असती तर कदाचित परिवर्तन विकास आघाडी टिकली असती. तिला मोठे यशदेखील मिळाले असते असेदेखील या परिवर्तनमधून बाहेर पडलेले राजकीय पक्ष सांगत आहेत. शिवसेना म्हणाली, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ आली तरी परिवर्तन विकास आघाडीला चिन्ह नव्हते व घड्याळ चिन्हावर आम्ही लढणार नव्हतो, त्यामुळे आम्हाला स्वबळाचा नारा देऊन परिवर्तनमधून बाहेर पडावे लागले.