लोणावळा: मागील साडेसात वर्ष लोणावळा नगर परिषदेमध्ये भाजपचा नगराध्यक्ष व सत्ता होती. मात्र, या वेळी जनतेने आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत लोणावळा शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निर्विवाद यश दिले आहे. नगराध्यक्ष पदासह 16 नगरसेवक या ठिकाणी राष्ट्रवादीचे निवडून आल्यामुळे नगर परिषद वर राष्ट्रवादीच्या घड्याळाची एक हाती सत्ता आली आहे.
भाजपला धक्का
लोणावळा शहरामध्ये भाजपच्या नगराध्यक्ष सुरेखा जाधव यांनी मोठ्या प्रमाणात विकासकामे केली होती. मात्र, तरीदेखील जनतेने त्यांना नाकारले असून, त्या ठिकाणी काँग्रेसमधून राष्ट्रवादीमध्ये दाखल होऊन उमेदवारी घेतलेल्या आरती मारुती तिकोने या विजय झाल्या आहेत. भाजपच्या दृष्टीने हा मोठा धक्का मानला जात आहे. विशेष म्हणजे साडेनऊ वर्षांपूर्वी लोणावळा नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादीचा एकही नगरसेवक निवडून आला नव्हता. या वेळी मात्र राष्ट्रवादीने जोरदार मुसंडी मारली आहे. लोणावळा शहरामध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणात निवडणुकीमध्ये पैशांचा वापर झाल्याची चर्चा आहे. सर्वच प्रभागांमध्ये कोटीच्या कोटी उड्डाणे झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी दिलेला कौल हा विकासाचा कौल म्हणावा की पैशाचा याबाबत वेगवेगळ्या चर्चा सध्या ऐकायला मिळत आहे.
अनेक ठिकाणी झाली अटीतटीची लढत
तब्बल साडेचार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर लोणावळा नगर परिषदेची निवडणूक दोन डिसेंबर रोजी पार पडली. प्रभाग क्रमांक पाच व प्रभाग क्रमांक दहा या ठिकाणी भाजपच्या उमेदवारांवर हरकती घेण्यात आल्यामुळे या दोन ठिकाणची निवडणूक 20 डिसेंबर रोजी पार पडली. मात्र, या ठिकाणी झालेल्या अटीतटीच्या व तुल्यबळ लढतीमध्ये प्रभाग क्रमांक पाचमधून भाजपचे उमेदवार विजयी झाले. तर, प्रभाग क्रमांक दहामध्ये भाजपच्या उमेदवाराला चितपाट करत काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला आहे.
नगरपरिषदेत 23 नवीन चेहरे
यावर्षीच्या निकालाचे वैशिष्ट्य म्हणजे 27 पैकी 23 नगरसेवक व नगराध्यक्ष अशा नवीन चेहऱ्यांना लोणावळाकरांनी संधी दिली आहे. मागील सभागृहामधील एक व त्यापूर्वीच्या तीन असे एकूण चार माजी नगरसेवकांना जनतेने कौल दिला आहे. विधानसभेच्या निवडणुकीमध्येदेखील लोणावळा शहराने आमदार सुनील शेळके यांना मोठी आघाडी दिली होती. त्याचीच पुनरावृत्ती या ठिकाणी आज पाहायला मिळाली. आमदारांनी लोणावळा शहरामध्ये मोठा विजय प्राप्त केला असला तरी त्यांचे खंदे समर्थक व राजनीतिकार म्हणून त्यांची ओळख आहे, अशा मुकेश परमार यांना मात्र प्रभाग क्रमांक पाचमधून पराभवाचा सामना करावा लागला.
निकाल घोषित होताच सर्वच विजयी उमेदवारांनी मोठा जल्लोष साजरा केला. अनेकजण पहिल्यांदाच नगरपालिकेमध्ये निवडून जात असल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांचा आनंद हा शब्दात व्यक्त करणारा नव्हता. यंदाच्या निकालावरून असे दिसून येते की लोणावळा शहरातून नागरिकांनी बदल स्वीकारला आहे. त्यामुळे नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांनादेखील जनतेचा कौल मान्य करत पुढील पाच वर्ष शहराचा विकासासाठी कामे करावे लागणार आहेत.