लोणावळा : तब्बल नऊ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर लोणावळ्यात 2 डिसेंबर रोजी सार्वत्रिक निवडणूक पार पडली. 2016 मध्ये लोणावळा नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक झाली होती. त्यानंतर 2021 मध्ये मुदत संपली. मात्र, राज्यात सर्वत्र स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रशासकीय राजवट लागल्याने डिसेंबर 2025 मध्ये ही रखडलेली निवडणूक पार पडली. विकासाच्या मुद्द्यावर सुरू झालेली ही निवडणूक अखेर पैशाच्या मुद्द्यावर संपली अशी सर्वत्र मोठी चर्चा आहे.
पैसे वाटपाची दिवसभर चर्चा
मात्र, लोणावळ्यात पोलिस असो वा निवडणूक आयोग यापैकी कोणालाही याचा मागमूस नाही. त्यामुळे शहरात कोठेही पैसे वाटपाबाबत कारवाई झालेली नाही. लोणावळ्यात एका मताला किती पैसे उमेदवारांनी वाटप केले याची खरमरीत चर्चा आज दिवसभर ऐकायला मिळत होती. त्यामुळे मतदारांनी यंदा विकासाला मतदान केले की पैशाला हे येत्या 21 डिसेंबर रोजी समजणार आहे.
21 डिसेंबरला समजणार नागरिकांचा कौल
लोणावळा शहरामधील सर्वसामान्य नागरिकांमध्ये असलेली ही चर्चा ही प्रशासनापर्यंतदेखील पोहोचत होती. मात्र, कोणतीही तक्रार येत नसल्यामुळे कोठेही या प्रकारची कारवाई झालेली नाही. मतदानाच्या दिवशीदेखील अनेक ठिकाणी पैसे वाटप केले जात असल्याचे नागरिक व मतदार बोलत होते. मात्र, अधिकृतरित्या कुठेही त्याची नोंद झालेली नाही. मतदान करणे हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. ते मतदान कोणाला करायचे याचे संपूर्ण स्वायत्त्य त्या मतदान करणाऱ्या व्यक्तीला आहे. मात्र, संविधानाची व घटनेची पायमल्ली करत मतदारांवर दबाव टाकत मताचा भाव ठरवत मते विकत घेतली जात होती. तसेच, मतेही विकली जात आहेत. त्यामुळे शहराचा व आपला लोकप्रतिनिधी म्हणून आपण कोणाला नगर परिषदेमध्ये पाच वर्षे पाठवणार आहोत याचा विसर मतदारांना पडत असल्याच्या अनेक प्रतिक्रिया जाणकारांकडून व्यक्त केल्या जात आहेत. त्यामुळे लोणावळा शहरामध्ये नागरिकांनी नेमका कोणाला कॉल दिला आहे हे येत्या 21 डिसेंबर रोजी समजणार आहे.
विकासाचा मुद्दा राहिला बाजूला
लोणावळ्यामध्ये सर्वच राजकीय पक्षांनी आपली उमेदवार उभे केले होते. त्यामुळे ही निवडणूक युती व आघाडी यांच्या माध्यमातून न होता पक्षपातळीवर पार पडली. यामध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व आरपीआय युती, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस या पक्षांनी आपले उमेदवार उभे केले होते. नगराध्यक्ष पदासाठीदेखील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आरपीआय युती, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांनी आपले उमेदवार दिले होते. आमदार सुनील शेळके यांनी लोणावळा शहर परिसरामध्ये केलेल्या विकासकामांच्या मुद्द्यांवर ही निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले होते. माजी नगराध्यक्ष सुरेखा जाधव यांनी मागील पंचवार्षिक काळामध्ये लोणावळा शहरामध्ये केलेल्या विकासकामांच्या मुद्द्यावर आपण या निवडणुकीला सामोरे जात आहोत, असे सांगितले होते. तसेच, सर्वच राजकीय पक्षांनी विकासाच्या मुद्दावर निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले होते. मात्र, आतमधून मतदारांना मोठ्या प्रमाणात पैसे वाटप केले जात होते, अशी सर्वत्र चर्चा आहे.