लोणावळा: घरगुती वादातून आणि दारूसाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून देऊन तिचा खून करणाऱ्या आणि तब्बल १८ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्याच्या पथकाने परभणी येथून अटक केली.
लिंबाजी नामदेव सोगेवाड (वय ५८) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. १ मार्च २००८ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास कुसगाववाडी (ता. मावळ, जि. पुणे) येथे ही दुर्दैवी घटना घडली होती. आरोपी लिंबाजी सोगेवाड हा दारू पिऊन घरी आला होता. त्याने आपली पत्नी व फिर्यादी लता लिंबाजी सोगेवाड (वय २५) यांच्याकडे दारूसाठी पैशांची मागणी केली. तिने पैसे देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या आरोपीने स्वयंपाकघरातील रॉकेलचे कॅन आणून तिच्या अंगावर ओतले आणि काडेपेटीने पेटवून देऊन तिचा निर्घृण खून केला होता. या घटनेनंतर आरोपी गेल्या १८ वर्षांपासून पोलिसांना चकमा देऊन फरार होता.
ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल्ल, अप्पर पोलिस अधीक्षक शुभम कुमार, उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोम्पे, प्रभारी अधिकारी भूषण माने आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक विजया म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सागर अरगडे, पोलिस उपनिरीक्षक नाथा केकाण, जय पवार, ईश्वर काळे, केतन तळपे, गोकूळ खेडकर, अमोल गवारी आणि महातपूरचे पोलिस पाटील विजय चाफळे यांनी पार पाडली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नाथा केकाण करीत आहेत.
तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे परभणीत आवळल्या मुसक्या
तपास पथकातील पोलिस उपनिरीक्षक नाथा केकाण यांना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, गुन्ह्यातील फरारी आरोपी हा परभणी जिल्ह्यात राहत आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नाथा केकाण, पोलिस हवालदार केतन तळपे आणि पोलिस शिपाई गोकूळ खेडकर यांचे पथक तातडीने परभणीकडे रवाना करण्यात आले. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सखोल तपास केला असता, आरोपी लिंबाजी सोगेवाड हा स्वतःचे नाव, पत्ता आणि अस्तित्व बदलून गंगाखेड तालुक्यातील महातपूर गावात राहत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी अत्यंत शिताफीने त्यास ताब्यात घेऊन त्याच्या मुसक्या आवळल्या.
पोलिसांची विशेष मोहीम अन् पथकाची स्थापना
पोलिस प्रशासनाकडून 'फरारी व पाहिजे आरोपी शोध विशेष मोहिमे'अंतर्गत फरारी आरोपींचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आले होते. या आदेशानुसार पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल्ल, अपर पोलिस अधीक्षक शुभम कुमार आणि लोणावळा विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा परीविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक भूषण माने आणि महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक विजया म्हेत्रे यांनी आरोपीचा शोध घेऊन त्यास जेरबंद करण्याचे निर्देश दिले होते.