लोणावळा: मागील चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर लोणावळा नगर परिषदेची निवडणूक जाहीर झाली आहे. प्रभाग रचना प्रभाग आरक्षणे झाल्यानंतर आता निवडणुकीची आचारसंहितादेखील लागू झाली आहे. तरीदेखील कोणत्याही राजकीय पक्षाकडून एकाही उमेदवाराची उमेदवारी जाहीर झालेली नाही. (Latest Pimpri chinchwad News)
नगराध्यक्ष पदासाठी सर्वच राजकीय पक्षांकडे अनेक इच्छुक असल्यामुळे कोणाला उमेदवारी द्यायची व कोणाचे बंड थंड करायचे, असा प्रश्न पक्षश्रेष्ठीं पुढे असल्यामुळे अद्याप उमेदवारी जाहीर झाल्या नाहीत. नगरसेवक पदाच्या देखील उमेदवारांची घोषणा झालेली नाही. त्यामुळे प्रबळ इच्छुक असणारे व इतर सर्वच इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे.
लोणावळा नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये विद्यमान आमदार सुनील शेळके व माजी आमदार तसेच माजी राज्यमंत्री बाळा भेगडे या तालुक्यातील दोन बड्या नेत्यांनी लक्ष घातले असून, लोणावळा शहरात निवडणुकीचे ते दोघेच प्रभारी आहेत. त्यामुळे यंदाची निवडणूक ही मोठी चुरशीची होणार आहे. उमेदवारी जाहीर करताना देखील समोरच्या पक्षाची रणनीती पाहून उमेदवार दिले जाणार असल्यामुळे अद्याप राष्ट्रवादी काँग््रेास पक्ष व भाजपा या दोन्ही पक्षांकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली नाही. इतर राजकीय पक्षांकडेदेखील कमी अधिक प्रमाणामध्ये इच्छुक आहेत. मात्र ही निवडणूक स्वबळावर लढावी की स्थानिक आघाडी करून लढावी याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नसल्यामुळे सगळीच संधिग्ध परिस्थिती निर्माण झालेली आहे.
नगराध्यक्षपदासाठी चुरस
10 नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जेमतेम चार दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. पुढे 17 नोव्हेंबरपर्यंत हे उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. मात्र उमेदवारांची अधिकृत घोषणा झालेली नसल्यामुळे कोणाचा नंबर लागणार व कोणाचा पत्ता कट होणार याबाबतदेखील कार्यकर्ते व मतदार यांच्यामध्ये उत्सुकता आहे. लोणावळा शहराचे नगराध्यक्ष पद हे अनुसूचित जाती याकरिता आरक्षित झालेले आहे. या पदासाठी शहरामध्ये विविध राजकीय पक्षांकडे मिळून किमान 15 पेक्षा अधिक इच्छुक उमेदवार असल्यामुळे या पदासाठी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सोबतच शहरांमधील काही महत्त्वाच्या व विशेषत: सर्वसाधारण जागा व नागरिकांचा मागास प्रवर्ग या ठिकाणी मोठी चुरस आहे. त्या ठिकाणी देखील पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार यावरदेखील अनेक गणिते ठरणार आहेत.
राजकीय पक्षांची खलबते सुरू
तूर्तास तरी भाजपा व राष्ट्रवादी काँग््रेास सोबतच इतर राजकीय पक्ष यांच्या बैठकांची खलबते विविध भागांमध्ये सुरू आहेत. उमेदवारांची चाचणी तसेच त्यांची आर्थिक क्षमता व लोकसंपर्क याचादेखील आढावा घेतला जात आहे. या सर्व बाबींचा विचार करून उमेदवारी जाहीर केली जाणार आहे. इच्छुकांकडून नागरिकांच्या गाठीभेटी सुरू आहेत तर काहीजण वेट अँड वॉच भूमिकेमध्ये आहे. निवडणुकांची घोषणा झाली असली तरी उमेदवारी संदर्भात निर्णय होत नसल्यामुळे इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे.