

पिंपरी : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टप्प्याटप्प्याने जाहीर होत आहेत. नुकत्याच नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुका जाहीर झाल्या. पुढील टप्प्यात जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुका जाहीर होतील. या निवडणुकांत भाजपकडून स्वबळावर निवडणुकीचा नारा देण्यात आला आहे. या निवडणुकांची रणनीती आखण्यासाठी निवडणूक प्रमुखपदांची जबाबदारी जाहीर करण्यात आली असून, पिंपरी-चिंचवडसाठी आमदार शंकर जगताप, तर मावळसाठी आमदार महेश लांडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.(Latest Pimpri chinchwad News)
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी पक्षनेतृत्वाने निवडणूक प्रमुख म्हणून चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांच्याकडे जबाबदारी सोपविली आहे; तसेच भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना पुणे उत्तर (मावळ) जिल्हा निवडणूक प्रमुख जबाबदारी देण्यात आली आहे. तर पुणे दक्षिण (बारामती) निवडणूक प्रमुखपदी आमदार राहुल कुल यांना जबाबदारी सोपवली आहे.
पिंपरी-चिंचवड हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता; मात्र गतवेळच्या निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला आपल्या ताब्यात घेतला होता. आगामी महापालिका निवडणुकीसाठी 128 उमेदवार रिंगणात असणार आहेत.अजित पवार गटाशी थेट सामना
पुणे, पिंपरी-चिंचवडबरोबरच ग्रामीण भागातही उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वर्चस्व आहे. या ठिकाणी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा थेट सामना रंगणार आहे. मावळ भागामध्ये भाजपचे संख्याबळ वाढवण्यासाठी व सत्ता काबीज करण्यासाठी आ. महेश लांडगे यांची नियुक्ती महत्त्वाची ठरणार आहे. त्याचप्रमाणे पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ता कायम राखण्याचेही आव्हान आ. शंकर जगताप यांच्यासमोर असणार आहे.