लोणावळा : लोणावळा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांमध्ये इच्छुकांची मोठी गर्दी झाली आहे. दोन्ही पक्षांकडून निवडणूक लढवण्यासाठी अनेकांनी उमेदवारी अर्ज घेतले आहेत व पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे, असे चित्र एकीकडे असताना शहरामध्ये असे काही प्रभाग आहेत की, ज्या ठिकाणी या राजकीय पक्षांना उमेदवारांची शोधाशोध करण्याची वेळ आली आहे.(Latest Pimpri chinchwad News)
प्रभागरचना व प्रभाग आरक्षणे जाहीर होऊन जवळपास तीन आठवडे होऊन गेले तरी काही प्रभागांमध्ये उमेदवार मिळत नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरामध्ये भारतीय जनता पक्षाकडे सर्वांधिक इच्छुक असून अनेक तगड्या इच्छुकांनी व माजी लोकप्रतिनिधी यांनी भाजप पक्षाकडून उमेदवारी अर्ज घेतले आहेत. विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये दोन गट निर्माण झाले होते. मात्र, या दोन्ही गटांनी भाजपकडेच उमेदवारी मागितली असून, भाजपलाच प्रथम पसंती देत पक्षाकडून उमेदवारी अर्ज घेतले आहेत. हे दोन्ही गट एकत्र आल्यास शहरामध्ये वेगळे चित्र दिसेल, असा विश्वास भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याकडून व्यक्त केला जात आहे. लोणावळा शहरामध्ये आजमितीला भाजपकडे अनुभवी इच्छुक उमेदवार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
आमदार सुनील शेळके यांना लोणावळा शहरामधून विधानसभा निवडणुकीमध्ये मोठी आघाडी मिळाली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडेदेखील इच्छुकांची मोठी संख्या असून, अनेकांनी उमेदवारी अर्ज पक्षाकडून घेतले आहेत. असे असले तरी काही प्रभागांमध्ये आजदेखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे सक्षम उमेदवार नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तर, काही ठिकाणी राष्ट्रवादीचेच सर्वांधिक इच्छुक असल्याचे पाहायला मिळत आहे. शहरामध्ये राजकीय पक्षाकडे 13 प्रभागांतील 27 जागा लढवण्यासाठी उमेदवार नसल्यामुळे या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षांना एकत्र करत आघाडी बनवत निवडणुका लढवण्याचा नवा फॉर्मुला उदयास येत आहे.
आमदार सुनील शेळके यांचा नावलौकिक व त्यांचा चेहरा समोर करून मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयोग शहरात अनेक इच्छुकांना करावा लागतो आहे. शहरामध्ये नगराध्यक्ष तसेच नगरसेवक पदाची निवडणूक लढवण्यासाठी अनेकजण इच्छुक असले तरी स्वकर्तृत्व नसल्याने आमदार शेळके यांच्या नावाचा व त्यांच्या चेहऱ्याचा वापर करून आपल्या पदरात मते कसे पडतील असा प्रयोग अनेक जण करत असल्याचे पाहायला मिळत आहे. आमदार शेळके यांना शहराने 18000 चे मताधिक्य दिले होते. मात्र, आमदार शेळके यांना मताधिक्य दिले म्हणून नागरिक तुम्हाला मतदान करतील, अशा भ्रमात तुम्ही राहू नका. ज्यांना निवडणूक लढवायची आहे त्यांनी जनतेमध्ये जाऊन कामे करा, केवळ निवडणुकीपुरती आश्वासने देत मतदारसंघात फिरून मतदारांना भूलथापा देऊ नका, तुम्ही प्रभागात किती वेळा फिरलात, नागरिकांचे किती प्रश्न सोडवले, तुमचा नागरिकांशी मतदारांशी संवाद कसा आहे या सर्व गोष्टींचा विचार करून मतदार मतदान करत असतो. मीसुद्धा पहिली पाच वर्षे काम केले, मग नागरिकांकडे मत मागायला गेलो तेव्हा मावळ तालुक्याने मला स्वीकारले हेदेखील आमदार शेळके यांनी मागील काळात इच्छुकांना सुनावले आहे.
भारतीय जनता पक्षाने मात्र आमच्याकडे सर्व प्रभागात उमेदवार असून, लवकरच त्यांची यादीदेखील आम्ही जाहीर करू, असे म्हटले आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये आमच्यात मतमतांतरे झाले असले तरी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आम्ही एकत्रितपणे सामोरे जाणार आहोत. आमदार सुनील शेळके यांच्या प्रचारात सक्रिय असलेल्या कार्यकर्त्यांनी भाजपकडूनच उमेदवारी अर्ज घेतले आहेत. शहरामध्ये भाजपने मागील पंचवार्षिक काळामध्ये केलेली कामे ही नागरिकांना आजही स्मरणात आहेत. न भूतो न भविष्य अशी कामे आम्ही केली असून, त्याच कामांच्या जोरावर मतदारांच्या समोर जाणार असल्याचे भारतीय जनता पक्षाच्या वतीने सांगण्यात आले. तर, आमदार सुनील शेळके यांनी केलेल्या कामांच्या जोरावर आम्ही मतदारांकडे मते मागणार असल्याचे राष्ट्रवादीकडून सांगण्यात येत आहे. इतर राजकीय पक्ष मात्र आम्हाला कोणाकडून संधी मिळेल याच्या प्रतीक्षेत आहेत.