Lonavala Monsoon Tourism Pudhari
पिंपरी चिंचवड

Lonavala Monsoon Tourism Planning: लोणावळ्यात पावसाळी पर्यटन बंदीपूर्वी नियोजन बैठकीची मागणी

व्यवसायावर उपजीविका असलेल्या नागरिकांचा सवाल; जिल्हाधिकाऱ्यांनी दोन महिने आधी समन्वय बैठक घ्यावी

पुढारी वृत्तसेवा

लोणावळा: लोणावळा, खंडाळा ही पावसाळी पर्यटनाची मध्यवर्ती ठिकाणे असल्याने दरवर्षी पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी लाखोंच्या संख्येने राज्यातील तसेच परराज्यातील पर्यटक येथे येत असतात. परिसरातील अनेक छोट्या-मोठ्या गावांचे अर्थकारण हे पर्यटन व्यवसायावर अवलंबून आहे. पावसाळी पर्यटनाच्या चार महिन्यांच्या व्यवसायावर अनेक कुटुंबांचा वर्षभराचा उदरनिर्वाह सुरू असतो.

असे असले तरी मागील काही वर्षांपासून प्रशासनाने अचानकपणे या भागातील पर्यटनावर बंदीचा निर्णय लादत असल्यामुळे येथील पर्यटन व्यवसायावर उपजीविका असलेल्या लहान-मोठ्या हजारो नागरिकांच्या अर्थकारणाचा प्रश्न निर्माण होऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ येत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी पावसाळी पर्यटनाच्या नियोजनाची दोन महिने अगोदर बैठक घ्यावी, अशी मागणी केली जात आहे.

स्थानिकांचा व्यवसाय अडचणीत

पर्यटनस्थळ बंदीचे प्रसंग टाळण्यासाठी प्रशासनाने पावसाळा सुरू होण्यापूर्वी व पावसाळी पर्यटनाचा हंगाम येण्याच्या किमान दोन महिनेअगोदर याबाबत योग्य प्रकारे नियोजन करावे. खासदार, आमदार, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, लोणावळा शहरातील प्रतिष्ठित नागरिक, येथील हॉटेल व चिक्की व्यावसायिक, लहान-मोठे व्यवसाय करणाऱ्या संघटनांचे पदाधिकारी, टॅक्सी संघटनेचे पदाधिकारी, रिक्षा संघटनेचे पदाधिकारी, पोलिस प्रशासन, तालुका प्रशासन, वन विभाग, रेल्वे विभाग, संरक्षण विभाग आदींची संयुक्तिक बैठक घेवून ठोस उपाययोजना कराव्यात. तसेच. व्यवसाय बंद होऊन सर्वसामान्य नागरिकांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होणार नाही याकडे जिल्हा प्रशासनाने गांभीर्यपूर्वक लक्ष देत दखल घ्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तसेच मी लोणावळाकर व जागरूक नागरिक या संघटनेचे किरण गायकवाड यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

प्रशासनाकडून व्यावसायिकांना दिला जातोय त्रास

याविषयी बोलताना किरण गायकवाड म्हणाले, की विविध राज्यांमध्ये पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी तेथील प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना करत पर्यटन व्यवसायाला चालना दिली जाते. मावळ तालुक्यात व लोणावळ्यात मात्र आम्हाला वेगळे चित्र निदर्शनास येत आहे. पावसाळ्यात वारंवार या भागातील पर्यटन व्यवसाय बंद करत येणाऱ्या पर्यटकांना त्रास देण्याची भूमिका घेतली जात आहे.

दरवर्षी पावसाळ्यामध्ये सलग सुट्यांच्या कालावधीमध्ये भुशी धरण व त्या परिसरामधील अनेक पर्यटनस्थळे बंद ठेवली जातात. पर्यटकांना त्या भागामध्ये जाऊन दिले जात नाही. अशा घटनांमुळे स्थानिकांच्या रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण होत आहे. तसेच, पर्यटकदेखील लोणावळ्याकडे पाठ फिरवू लागले आहेत. या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी किरण गायकवाड यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT