Lonavala Modified Silencer Action Pudhari
पिंपरी चिंचवड

Lonavala Modified Silencer Action: लोणावळ्यात सायलेन्सर बदलणाऱ्या दुचाकींवर पोलिसांची मोठी कारवाई

शंभरहून अधिक वाहनांवर दंड, कर्णकर्कश सायलेन्सर रोड रोलरखाली चिरडले

पुढारी वृत्तसेवा

लोणावळा: लोणावळा शहर व परिसरामधील तरुणांकडून दुचाकी वाहनाच्या सायलेन्सरमध्ये बदल करत त्यामधून कर्णकर्कश आवाज काढणे तसेच फटाके फोडणे असे प्रकार करणाऱ्या शंभरहून अधिक दुचाकीचालकांवर लोणावळा शहर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. मागील काही दिवसांपासून लोणावळा शहरामध्ये हे प्रकार वाढले होते. विशेषतः शाळा महाविद्यालयांच्या परिसरामध्ये तरुण अशी वाहने घेऊन येत सायलेन्सरमधून मोठे आवाज काढणे, फटाके वाजवणे असे प्रकार करत होते. गावांमधील अंतर्गत रस्त्यांवरदेखील वेगात वाहने चालवत सायलेन्सरमधून वेगवेगळे आवाज काढत ध्वनी प्रदूषण करत होते.

लोणावळ्यातील ॲड. बापूसाहेब भोंडे हायस्कूलचे चेअरमन माधवराव भोंडे यांनी याबाबत एक संतप्त प्रतिक्रिया व निवेदन लोणावळा शहर पोलिसांना दिले होते. शहरातील सुजान नागरिकांनीदेखील याबाबत कारवाई करण्याची मागणी पोलिस प्रशासनाकडे केली होती. या सर्व बाबींची दखल घेत मागील तीन दिवसांपासून लोणावळा शहर पोलिसांनी बुलेट राजांवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली. केवळ दोन दिवसांमध्ये शंभरहून अधिक वाहनांवर कारवाई करण्यात आली. सायलेन्सरमध्ये बदल केलेल्या वाहनांचे सायलेन्सर पोलिसांनी काढून घेतले व हे सर्व सायलेन्सर रोड रोलरच्या खाली चेंबवत त्यांचा अक्षरशः चक्काचूर करण्यात आला आहे.

लोणावळा पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे वाहनांच्या सायलेन्सरमध्ये बदल करणाऱ्यांना एक चांगलाच झटका बसला असून, या पुढील काळात असे बदल कोणी करणार नाहीत, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. पोलिस प्रशासनाने ही कारवाई या पुढील काळातदेखील सुरू ठेवण्याचे स्पष्ट केले असून, केवळ दुचाकी वाहनेच नाही, तर संपूर्ण काळ्या काचा करून फिरणाऱ्या चारचाकी वाहनांवर व नंबर प्लेटमध्ये बदल करणाऱ्या वाहनांवरदेखील कारवाई करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. लोणावळा शहरचे पोलिस निरीक्षक राजेश रामाघरे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे पोलिस हवलदार अनिल शिंदे व त्यांच्या टीमने ही कारवाई केली आहे.

लोणावळ्यात दर शनिवार व रविवारी मोठ्या प्रमाणात बायकर्स येत असतात. खंडाळ्यात कामत हॉटेल ते मनशक्तीदरम्यान तसेच गावातील रस्ते, कुमार चौक ते लायन्स पॉईंट या भागात ही बायकर्स अतिशय वेगात वाहने पळवत. एकामागे एक अशी शेकडो वाहने अतिशय वेगात व जोरात आवाज करत जातात. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अनेक वेळा या दुचाकीस्वारांचे अपघातदेखील झाले आहेत.

गुगल मॅपमुळे हे दुचाकीस्वार गावातील अंतर्गत रस्त्यावरूनदेखील वेगात जातात. अमृतांजन पुलाजवळ जुन्या मार्गावर अनेक वेळा स्टंट करतात. लोणावळ्यातील सहारा पुलावरदेखील स्टंट करतात, यामुळे वाहतूक विस्कळीत होत आहे. पोलिसांनी या बायकर्स चालकांवर देखील कारवाई करावी व त्यांना लोणावळ्यात येण्यास बंदी घालावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT