लोणावळा: मावळ तालुक्यातील जवण येथे पित्याकडूनच अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रशासकीय यंत्रणेचा आढावा घेतला. पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झालेल्या पीडित मुलीने शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा व्यक्त केल्यास, तिच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी शासनाने उचलावी, अशा सूचना त्यांनी या वेळी केल्या.
लोणावळा येथे आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. या प्रसंगी मावळचे प्रांतांधिकारी संदेश शिर्के, तहसीलदार विक्रम देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोम्पे, पोलिस निरीक्षक दिनेश तायडे, सहायक पोलिस निरीक्षक विजया म्हेत्रे आदी अधिकारी उपस्थित होते.
तालुकास्तरावर महिलांची कोअर टीम उभारणार
अल्पवयीन मुलींवरील अत्याचार आणि छेडछाडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी केवळ पोलिस यंत्रणेवर अवलंबून न राहता गाव आणि तालुका पातळीवर महिलांची एक अनौपचारिक कोअर टीम किंवा यंत्रणा उभी करण्याच्या सूचना डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या. यामध्ये लाडकी बहीण योजनेतील महिलांचा समावेश करून त्यांना माहिती संकलन आणि मार्गदर्शनाचे प्रशिक्षण द्यावे, जेणेकरून छुप्या घटना उजेडात येण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले.
140 नवीन विशेष पोक्सो न्यायालयांची गरज
पोक्सो प्रकरणांत निकालाला विलंब होत असल्याने आरोपी अनेकदा पॅरोलवर बाहेर येतात आणि पुन्हा गुन्हे करण्याची शक्यता निर्माण होते, अशी भीती व्यक्त करत डॉ. गोऱ्हे यांनी जलद न्यायदानावर भर दिला. राज्यभरात पोक्सो केसेससाठी 140 नवीन न्यायालये उभारण्याची मागणी त्यांनी केली आहे. सध्या केवळ 38 न्यायालये कार्यरत असून, उर्वरित न्यायालये तातडीने सुरू झाल्यास गुन्हेगारांवर कायद्याचा वचक बसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तक्रार करण्यासाठी महिलांनी पुढे यावे
डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पोक्सो पीडितांच्या शिक्षणाची जबाबदारी आता शासनाने उचलावी, अशी सूचना केल्या. तसेच, छेडछाड रोखण्यासाठी तालुकास्तरावर महिलांची कोअर टीम सज्ज होणार आहे. गुन्हेगारांना जरब बसवण्यासाठी राज्यात 140 विशेष न्यायालयांची मागणी त्यांनी केली आहे. अमली पदार्थ आणि दारूच्या विळख्यातून कुटुंबांना वाचवण्यासाठी बीट मार्शल ॲक्शन मोडवर आहे. तसेच, कुटुंबातील अत्याचाराविरोधात तक्रार देण्यासाठी महिलांनी पुढे येण्याचे आवाहन डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले आहे.
व्यसनाधीनता, कौटुंबिक दडपशाहीवर प्रहार
कौटुंबिक स्तरावर होणाऱ्या अत्याचारांमागे दारू, अमली पदार्थांचे व्यसन आणि महिलांची आर्थिक परावलंबिता ही मुख्य कारणे असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. विशेषतः गरीब कुटुंबांमध्ये अशा घटनांचे प्रमाण अधिक आहे. महिला आता पुढे येऊन तक्रारी देत आहेत, ही सकारात्मक बाब आहे. मात्र, या तक्रारींचे रूपांतर लवकरात लवकर शिक्षेत होणे गरजेचे आहे, अन्यथा समाजात नैराश्य पसरेल, असेही त्या म्हणाल्या.
अमली पदार्थ विक्रीविरोधात कडक पावले उचला
ग्रामीण भागात अमली पदार्थांच्या वाढत्या तस्करीबद्दल चिंता व्यक्त करत नफेखोर दलालांना रोखण्यासाठी बीट मार्शल यंत्रणेने अधिक प्रभावीपणे काम करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. केवळ कारवाई करून न थांबता ग्राम पातळीवर नागरिकांची एक समिती जोडून जनजागृती करण्याचे नियोजनही या बैठकीत करण्यात आले.