Lonavala Car Accident Pudhari
पिंपरी चिंचवड

Lonavala Car Accident Rescue: निसर्गदृश्य पाहण्याचा मोह पडला महागात; लोणावळ्यात ५० फूट दरीत कोसळली कार, पोलिसांनी वाचवला चालकाचा जीव

खंडाळा घाटातील थरारक अपघात; महामार्ग पोलिसांनी जीव धोक्यात घालून केली बचाव मोहीम, गुरुग्रामचा चालक सुखरूप

पुढारी वृत्तसेवा

लोणावळा: खंडाळा घाटातील गारमाळ रस्त्यावर सोमवारी सकाळी एका थरारक अपघाताची घटना घडली. दरीतील निसर्गरम्य दृश्य पाहण्याच्या मोहापायी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार तब्बल ५० फूट खोल दरीत कोसळली. मात्र, महामार्ग पोलिसांनी दाखवलेल्या प्रसंगावधान आणि धाडसी बचाव मोहिमेमुळे चालकाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.

दृश्य पाहण्याचा मोह पडला महागात

मिळालेल्या माहितीनुसार, चालक मोहित स्वरूप भटनागर (५१, रा. गुरुग्राम, हरियाणा) हे सोमवारी सकाळी गारमाळ रस्त्यावरून प्रवास करत होते. प्रवासादरम्यान कनेक्टिंग लिंकवरील ब्रिजचे विहंगमय दृश्य पाहण्याच्या मोहापायी त्यांनी कार कच्च्या रस्त्यावर घेतली.

मात्र, अचानक चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट दरीत कोसळली. चार ते पाच पलट्या खात कार तब्बल ५० फूट खाली दरीत जाऊन पडली. अपघाताचे भयानक स्वरूप पाहून उपस्थितांनी चालक वाचण्याची आशाच सोडली होती.

महामार्ग पोलिसांची धाडसी बचाव मोहीम

घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिस केंद्र बोरघाट येथील प्रभारी अधिकारी स्वप्नील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथक अवघ्या काही मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले. अत्यंत खोल आणि धोकादायक दरीत उतरणे कठीण असतानाही महामार्ग पोलिस पथकातील कर्मचाऱ्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घातला.

पोलिस कर्मचारी संदीप पवार, किरण शिंदे, भरत पावरा, गणेश खाडे, संतोष गुजरवार आणि गोडसे या पोलिस कर्मचाऱ्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने दरीत उतरून कारमध्ये अडकलेल्या मोहित भटनागर यांना सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर तातडीने रुग्णवाहिकेतून त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले.

चालक सुखरूप; पोलिस दलाचे कौतुक

या भीषण अपघातात सुदैवाने चालक मोहित भटनागर यांना किरकोळ दुखापत झाली आहे. जर महामार्ग पोलिसांच्या मदतीला काही क्षणांचा जरी उशीर झाला असता, तर जीवितहानी झाली असती असा अंदाज व्यक्त केला जात आहे. महामार्ग पोलिसांनी दाखवलेली प्रसंगावधानता, धाडस आणि तत्परतेमुळे एका नागरिकाचा जीव वाचला असून, या यशस्वी बचावकार्यासाठी महामार्ग पोलिस दलावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT