लोणावळा: मागील आठवडाभरापासून उघडीप घेतलेल्या पावसाचा जोर लोणावळा शहरात पुन्हा वाढला आहे. शनिवारी सकाळपासूनच पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. सकाळच्या सत्रात ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. त्यातच शनिवार व रविवारची सुटी असल्यामुळे शहरात पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. पर्यटकांच्या या वाहनांमुळे शहरातून जाणाऱ्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर वाहतूककोंडी झाली होती.
दुधीवरे खिंड परिसरात वाहनांच्या रांगा
पवनानगराकडे जाणाऱ्या मार्गावरदेखील दुधीवरे खिंड परिसरात मोठी कोंडी झाली होती. भुशी धरणाकडे जाणाऱ्या मार्गावरदेखील लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाच, सहा व सात जुलै रोजी लोणावळा शहरात मुसळधार पाऊस झाल्यामुळे शहरातील बहुतांश भागात पूरस्थिती निर्माण झाली होती.
त्यानंतर पावसाने समाधानकारक उघडीप घेतली. 15 जुलैपासून शहरात पुन्हा पावसाला सुरुवात झाली. दोन दिवस कमी अधिक प्रमाणात पडलेल्या पावसाचा जोर शनिवारी पुन्हा वाढला आहे. त्यामुळे सखल भागातील अनेक रस्त्यावर पुन्हा पाणी साचलेले पहायला मिळाले. पावसाचा जोर वाढल्यास प्रशासनाने व लोणावळा नगर परिषदेने आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी सज्ज रहावे, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
स्थानिकांना मिळाला रोजगार
जिल्हाधिकारी यांनी मागील आठवड्यात लोणावळा शहर व ग्रामीण भागातील पर्यटनस्थळांवर लागू केलेले प्रतिबंधात्मक आदेश मागे घेतल्याने पर्यटक व स्थानिक व्यासायिक आनंदित होते. त्यामुळे मावळ तालुक्यातील विविध पर्यटनस्थळांवर पर्यटकांची गर्दी होवू लागली आहे. यामुळे परिसरात वाहतूककाेंडी होत असून, स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. ही वाहतूककोंडी सोडविताना पोलिसांबरोबरच स्थानिक नागरिकही मदत करताना दिसत आहेत. मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागातील रस्ते खचले आहेत. त्यामुळे वाहन चालविताना चालकांना कसरत करावी लागत आहे. नागरिकांनी लवकरात लवकर रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, पर्यटकांच्या गर्दीमुळे स्थानिकांनाही चांगला रोजगार मिळू लागल्यामुळे ते आनंदीत दिसत आहेत.
खंडाळा परिसरात धुक्याची चादर
लोणावळा शहरात सुट्यांचा आनंद घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांसाठी आजचा पाऊस पर्वणी ठरला. सहारा पुलासमोरील दोन्ही धबधबे आज भरभरून वाहत होते. त्याखाली भिजण्याचा आनंद पर्यटकांनी घेतला. प्रसिद्ध भुशी धरणाच्या पायऱ्यांवर बसून भिजण्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होती. लायन्स पॉईंट, तुंगार्ली धरण या भागातदेखील पर्यटकांची गर्दी झाली होती. खंडाळा परिसरात पावसाच्या सोबत धुकेदेखील असल्याने निसर्गाच्या या रूपाचा मनमुराद आनंद पर्यटकांनी घेतला.