Glass Skywalk Pudhari
पिंपरी चिंचवड

Lonavala Glass Skywalk Project: लोणावळ्यात 200 कोटींचा ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्प; पर्यटनाला नवे परिमाण

लायन्स पॉईंट–टायगर पॉईंटला जोडणारा काचांचा पूल; साहसी खेळ, कॅफे आणि जागतिक दर्जाच्या सुविधांसह पर्यटन विकासाला चालना

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: मावळ तालुक्यातील निसर्गरम्य पर्यटनस्थळ म्हणून ओळख असलेल्या लोणावळा येथे लवकरच अत्याधुनिक ‌‘ग्लास स्कायवॉक‌’ उभारण्यात येणार असून, त्यामुळे या परिसरातील पर्यटनाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) मार्फत हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवला जात आहे. हा स्कायवॉक लायन्स पॉईंट आणि टायगर पॉईंट या दोन लोकप्रिय व्ह्यू पॉइंट्‌‍सना जोडणार असून, पर्यटकांना सह्याद्रीच्या दऱ्यांचे अप्रतिम दृश्य अनुभवता येणार आहे.

निधी आणि प्रशासकीय मान्यता

या प्रकल्पासाठी अंदाजे 200.50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, राज्य सरकारसोबतच केंद्राकडूनही अतिरिक्त निधी मिळण्याची शक्यता आहे. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या योजनेला प्राधान्य दिले होते. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या प्रकल्पास मान्यता देण्यात आली.

सार्वजनिक-खासगी भागीदारीत विकास

हा प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर राबवण्यात येणार असून, लायन्स पॉईंट परिसरात रूफटॉप कॅफे, प्रवेशद्वार, तिकीट काउंटर आणि विस्तृत पार्किंग सुविधा उभारल्या जाणार आहेत. पर्यटकांच्या सोयीसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.

स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना

या प्रकल्पामुळे स्थानिक रोजगारनिर्मितीला मोठी चालना मिळेल. पर्यटन वाढल्याने हॉटेल, रेस्टॉरंट, स्थानिक व्यवसाय आणि वाहतूक क्षेत्राला फायदा होणार आहे. परिसराचा एकात्मिक विकास साधण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

पर्यटनाला नवे आकर्षण

लोणावळा आधीच मुंबई-पुणे मार्गावरील लोकप्रिय ठिकाण आहे. नव्या स्कायवॉकमुळे हे ठिकाण जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. सह्याद्रीच्या कुशीत उभारला जाणारा हा काचांचा पूल पर्यटकांसाठी थरारक आणि अविस्मरणीय अनुभव ठरणार आहे.

प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्‌‍ये

  • काचांचा स्कायवॉक: 125 मीटर लांबी व 6 मीटर रुंदी

  • अतिरिक्त पूल: 90 मीटर लांबीचा संपर्क पूल

  • ॲम्फीथिएटर: 1000 प्रेक्षक क्षमतेचे

  • साहसी खेळ: झिप लाईन, बंजी जंपिंग

  • मनोरंजन सुविधा: लेझर लाईट व साउंड शो

  • फेरिस व्हील: 30 मीटर व्यास

  • पार्किंग: 1500+ कार व 2000 दुचाकी क्षमता

पायाभूत सुविधांवर भर

  • पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रस्ते व मूलभूत सुविधांमध्ये मोठे बदल करण्यात येणार आहेत.

  • रस्ते रुंदीकरण : भुशी धरण ते पॉईंट्‌‍सपर्यंत सुधारणा

  • पाणी व वीज : स्वतंत्र पुरवठा यंत्रणा

  • सुरक्षा : सीसीटीव्ही, फायर स्टेशन

  • स्वच्छता : सार्वजनिक शौचालये व कचरा व्यवस्थापन

  • पार्किंग व प्लाझा : नियोजित जागा व वॉकिंग क्षेत्र

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT