DJ Free Ganeshotsav Pudhari
पिंपरी चिंचवड

Lonavala DJ Free Ganeshotsav: लोणावळ्यात गणेशोत्सवात डीजेला लगाम; मोठ्या आवाजात साउंड वाजवल्यास कारवाईचा इशारा

पारंपरिक वाद्यांच्या गजरात उत्सव साजरा करण्याचे आवाहन; विसर्जन घाट सज्ज, हॉटेल-बंगल्यांतील डीजेवरही नजर

पुढारी वृत्तसेवा

लोणावळा: डीजे ही आपली संस्कृती व परंपरा नाही, यामुळे मोठ्या आवाजात साउंड वाजवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. सर्वांनी पारंपरिक वाद्यांच्या गजरात उत्सव साजरा करावा. ध्वनिप्रदूषणाचे नियम पाळल्यास पोलिसांचे पूर्ण सहकार्य राहील, असे पोलिस निरीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयाेजित बाष्ट्रीय एकात्मता, सामाजिक सलोखा आणि पारंपरिक संस्कृती जपत गणेशोत्सव शहरात अत्यंत उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्याचा निर्धार करण्यात आला. या वेळी तहसीलदार विक्रम देशमुख, मुख्याधिकारी अशोक साबळे, पोलिस निरीक्षक सचिन पाटील, नगरसेवक निखिल कविश्वर, नगरसेवक मंगेश मावकर यांच्यासह शहर गणेशोत्सव मंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

वादाचे प्रसंग टाळा

गणेशोत्सवाचा मूळ उद्देश राष्ट्रीय एकात्मता जागृत करणे हा होता. सण सर्वांनी आनंदाने आणि विधायक उपक्रमांनी साजरा करावा. प्रतिष्ठापनेपासून ते विसर्जन मिरवणुकीपर्यंत कोणत्याही छोट्या घटनेवरुन वाद होणार नाही, याची काळजी घ्यावी. मंडळांनी चौकात वेळेचे नियोजन, शिस्त आणि कार्यकर्त्यांची नियुक्ती योग्य प्रकारे करावी. मिरवणुका वेळेत सुरू करून वेळेतच संपवाव्यात. प्रशासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल, असे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी सांगितले.

कायद्याचे पालन करा

कायदा व सुव्यवस्थेचे पालन करून उत्सव निर्विघ्नपणे पार पडावा. बाप्पांच्या प्रतिष्ठापनेपासून विसर्जनापर्यंत अमंगल कोणतेही काम होणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यावी. विसर्जन मिरवणुकीत प्रत्येक मंडळाला पुरेसा वेळ मिळेल, असे नियोजन प्रशासनाने केले आहे, असे मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी सांगितले.

विसर्जन घाटांची तयारी पूर्ण

नगरसेवक निखिल कविश्वर यांनी सांगितले, की लोणावळ्याला १०० वर्षांची गणेशोत्सवाची मोठी परंपरा आहे. शहरात सर्व जाती-धर्माचे नागरिक गुण्यागोविंदाने हा सण साजरा करतात. हुडको, डॅम, ठोंबरेवाडी, जय मल्हार साधना कुटीर, नांगरगाव, तुंगार्ली, वळवण (येथे प्रत्येकी दोन बोटींची व्यवस्था) आणि काचवाला पूल या सर्व ठिकाणी विसर्जन घाटांची सोय करण्यात आली आहे.

घाटावर निर्माल्य कलशची सोय

विसर्जन घाटांवर हाय मास्ट, लाईट व्यवस्था, उंच गाड्या आणि निर्माल्य कलश तैनात केले आहेत. २४ तास अधिकारी व कर्मचारी विसर्जन हौदावर शेवटचा गणेशमूर्ती विसर्जित होईपर्यंत उपस्थित राहतील. लोणावळा नगर परिषदेच्या वतीने शतक महोत्सव व रौप्य महोत्सव साजरा करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांचा विशेष सत्कार केला जाणार आहे.

हॉटेल, बंगल्यांमधील डीजेवरही कारवाई करावी

बैठकीत डीजेच्या आवाजावरून चर्चा झाली. शासनाच्या नियमानुसार ७५ डेसिबल ही आवाजाची मर्यादा असून, ती ओलांडल्यास डीजे जप्त केला जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला. यावर हॉटेल व बंगल्यांमध्ये वाजणाऱ्या डीजेवर पोलिस काय कारवाई करतात, असा सवाल नगरसेवकांनी उपस्थित करत पोलिसांचे नियोजन प्रत्यक्षात दिसावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT