Lonavala Nagar Parishad Pudhari
पिंपरी चिंचवड

Lonavala Flood Controversy: लोणावळ्यातील पूरस्थितीवरून खडाजंगी; टाटा कंपनीकडून नुकसान भरपाई वसुलीची नगरसेवकांची मागणी

सर्वपक्षीय नगरसेवकांचा आरोप; पूरपरिस्थितीला जबाबदार निश्चित करून कारवाईची मागणी, चार तास रंगली सर्वसाधारण सभा

पुढारी वृत्तसेवा

लोणावळा: शहरामध्ये निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीला टाटा कंपनीच जबाबदार असून, त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करून नागरिकांची नुकसान भरपाई वसूल करावी व योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी लोणावळा नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली आहे.

नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेचा प्रश्नोत्तराचा तास तब्बल चार तास चालला. 'शहरामध्ये निर्माण झालेली पूरपरिस्थितीला जबाबदार कोण' या विषयावर बहुतांश सदस्यांनी आपली मते मांडली. प्रश्नोत्तराच्या तासासाठी सात सदस्यांनी आपली पत्रे नगराध्यक्षांकडे दिली होती. त्या सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर चर्चा झाल्यानंतर उर्वरित सदस्यांना खुली चर्चा करण्यासाठी नगराध्यक्षांनी वेळ दिला. मात्र, ही चर्चा तब्बल चार तास सुरू होती.

अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करा

शहरातील अनधिकृत होर्डिंगचा मुद्दा नगरसेवक सुमित गवळी यांनी उपस्थित केला. शहरामध्ये किती होर्डिंगना अधिकृत परवानगी देण्यात आली आहे. तसेच, जे होर्डिंग अनधिकृत आहेत, त्यांच्यावर नगर परिषदेने काय कारवाई केली याची माहिती मिळावी, अशी मागणी त्यांनी केली.

पुराला जबाबदार बांधकाम व्यावसायिकांकडून भरपाई वसूल करा : सुभाष डेनकर

ज्या अनधिकृत बांधकामामुळे शहरामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली होती, त्या बांधकामांवर कारवाई करत त्यांच्याकडून नुकसान भरपाई वसूल करावी, अशी मागणी नगरसेवक सुभाष डेनकर यांनी केली आहे. नयना पैलकर म्हणाल्या, की मी आत्तापर्यंत 21 पत्र नगर परिषदेला दिली आहेत. मात्र, एकाही पत्राचे उत्तर प्रशासनाकडून आम्हाला मिळालेले नाही. नगर परिषदेचे अधिकारी सध्या एसआयआरच्या कामात गुंतले आहेत. तसेच, दैनंदिन कामकाज सुरू असल्यामुळे मागील काही वर्षांमधील माहिती देण्यास विलंब होत आहे. मात्र, लवकरात लवकर माहिती देण्याबाबत विभागांना सूचना देऊ, असे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले.

पावसाळापूर्व कामांचा बोजवारा

नगरसेवक निखिल कविश्वर यांनीदेखील पूरपरिस्थितीचा आढावा घेताना टाटा कंपनीच्या धोरणावर जोरदार निशाणा साधला.‌ शहरामध्ये निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीला टाटा कंपनी पूर्णपणे जबाबदार आहे. त्यांच्याकडून या नुकसानीची भरपाई घ्यावी. तसेच, भविष्यात शहरामध्ये पूर येणार नाही याकरिता टाटा कंपनीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली. उपनगराध्यक्ष देविदास कडू यांनी मात्र या संपूर्ण पूरपरिस्थितीला प्रशासन जबाबदार असल्याचे म्हटले आहे. मोबीन इनामदार यांनी या पूर परिस्थितीला जबाबदार असणाऱ्या टाटा कंपनी व योग्य प्रकारे नालेसफाई न करणाऱ्या ठेकेदाराकडून नुकसान भरपाई वसूल करावी, अशी मागणी केली आहे.

प्रश्नोत्तराचा तास सुरू होण्यापूर्वीच शाब्दिक वाद

नगर परिषदेची तहकूब सभा बुधवारी 15 जुलै रोजी सकाळी साडेअकरा वाजता सुरू होताच विरोधी पक्षातील सदस्यांनी प्रश्न विचारत नगराध्यक्षांना फैलावर घेतल्याने सदस्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. यामुळे सभा सुरू होताच दहा मिनिटे तहकूब करावी लागली. मागील सहा महिन्यांतील ही तिसरी सर्वसाधारण सभा आहे. या सभेमध्ये 85 विषय चर्चेसाठी घेण्यात आले होते. मात्र, कोणत्याही विषयाचा सविस्तर अहवाल सदस्यांना वाचायला मिळाला नाही.

नगरपरिषदेची बदनामी बंद करा

धनंजय काळोखे यांनी शहरात झालेल्या मुसळधार पावसाच्या कालावधीमध्ये नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी व लोकप्रतिनिधींनी दिवस-रात्रं काम केले आहे‌. त्यामुळे कोणीही त्यांच्यावर चुकीचे आरोप करू नयेत, असे सांगत काही विरोधी पक्षाचे लोक शहरामध्ये चमकोगिरी करत सत्ताधाऱ्यांना बदनाम करत असल्याचा आरोप केला. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आमदार सुनील शेळके यांच्यामुळे शहरामध्ये अतिक्रमणे वाढत आहेत, असा आरोप माजी नगराध्यक्ष व माजी उपनगराध्यक्ष यांनी दोन दिवसांपूर्वी केला होता. याचा त्यांनी सभागृहात निषेध नोंदवत प्रशासनाने या दोन्ही माजी लोकप्रतिनिधींना बोलवून कोणती अतिक्रमणे झाली आहेत त्याची यादी घेऊन कारवाई करावी, अशी मागणी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT