लोणावळा: नैसर्गिक आपत्तीमुळे लोणावळा शहरामध्ये निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीत वेगवेगळ्या ठिकाणच्या 250 हून अधिक घरांचे मोठे नुकसान झाले आहे. जवळपास 503 नागरिकांचे प्रशासनाकडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरण करण्यात आले आहे. 29 जून ते 5 जुलैपर्यंत लोणावळा शहरामध्ये 2226 मिमी (87.63 इंच) एवढा पाऊस झाला आहे. त्यापैकी 1398 मिमी (55 इंच) एवढा पाऊस अवघ्या तीन दिवसांत झाला आहे.
आभाळ फाटल्याप्रमाणे लोणावळा शहरामध्ये 5, 6 व 7 जुलै रोजी पाऊस झाला आहे. या पावसामुळे शहराला पुराचा विळखा बसला. निर्माण झालेल्या या नैसर्गिक संकटाचा सामना करण्यासाठी नगर परिषद प्रशासन व लोकप्रतिनिधी, विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते काम करत आहेत. पाणीपातळी वाढलेल्या भागामध्ये रेस्क्यू करत नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. शहर हे उंचावर असल्यामुळे शहरामध्ये एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस होऊनदेखील अनेक भागातील पाणी हे उताराच्या दिशेने वाहून गेले. इंद्रायणी नदीपात्राच्यालगत असलेली घरे या मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात बाधित झाली आहेत.
लोणावळा धरण ओव्हरफ्लो
जवळपास 250 हून अधिक कुटुंबांचे यामध्ये मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाची बाब म्हणजे या नैसर्गिक आपत्तीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. लोणावळा धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे धरणाचे पाणी शहरामध्ये आले. हे पाणी शहरामध्ये येऊ नये याकरिता नगर परिषद प्रशासनाने प्रशासकीय पातळीवर मोठ्या हालचाली करत तसेच मंत्रालयामध्ये संपर्क साधत ते पाणी डक्ट लाईनच्या माध्यमातून घाट क्षेत्रामध्ये सोडण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे तिसऱ्या दिवशी शहरातील पूरपरिस्थिती हळूहळू ओसरू लागली आहे.
अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
सात जुलैच्या रात्री पुन्हा पावसाचा जोर वाढल्यामुळे मध्यरात्रीनंतर नागरिकांना सुरक्षित ठिकाणी येण्यासाठी प्रशासनाकडून सूचना देण्यात आल्या. सुदैवाने धरणाचे पाणी डक्टलाईनमार्गे सुरू झाल्यामुळे शहरावर आलेले हे दुसरे संकट टळले. पावसाचा जोर कमी झाला असला तरी पाऊस सुरूच असल्यामुळे नदीपात्रातील पाण्याची पातळी कमी झालेली नाही. त्यामुळे अद्यापही हुडको कॉलनी व नांगरगाव भागातील काही सोसायटीमध्ये पाणी कायम आहे. नदीपात्रातील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर हे पाणी कमी होणार आहे. तूर्तास नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. नगर परिषदेच्या वतीने नगर परिषद इमारतीच्या तळमजल्यावर आपत्ती व्यवस्थापन कक्ष सुरू केला असून, संपर्क नंबरदेखील प्रसिद्ध केली आहेत. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे व सोशल मीडियावरील कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. आपल्यापर्यंत कोणतीही माहिती आली तर ती अधिकृत यंत्रणेकडून पूर्व तपासणी करून घ्यावी, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.
आपत्ती व्यवस्थापन मदतकक्षाची स्थापना
सध्याची पूरपरिस्थिती आणि संभाव्य धोके लक्षात घेता स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी लोणावळा नगर परिषदेने एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. नगर परिषदेमार्फत शहरात तातडीने आपत्ती व्यवस्थापन मदतकक्ष स्थापन करण्यात आला असून, नागरिकांना कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत मिळावी, यासाठी विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, नियुक्त केलेले हे आपत्ती व्यवस्थापन पथक लोणावळा नगर परिषद वाहनतळ येथे कार्यालयीन वेळेत उपस्थित असणार आहे. याद्वारे आपत्तीच्या काळात मदतकार्य वेगाने करणे आणि नागरिकांपर्यंत सेवा पोहोचवणे अधिक सोपे होणार आहे.
संपर्कासाठी अधिकृत क्रमांक
कोणत्याही प्रकारची आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास, माहिती देण्यासाठी किंवा आवश्यक मदतीसाठी प्रशासनाने निलोफर शेख ९०२२१२५३७३, प्रियांका जेदे ८७८८२५६५४०, वृषाली बोबटे ८००७८५१७०६, रोशना माने ८८०६५९५५६२ या अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक जाहीर केले आहेत.
प्रशासनाला सहकार्य करा
लोणावळा नगर परिषदेने नागरिकांना शांतता व सतर्कता राखण्याचे आवाहन केले आहे. शहरातील नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. केवळ अधिकृत सूत्रांकडून येणाऱ्या माहितीवरच विसंबून राहावे. प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे आणि कोणतीही अडचण किंवा आपत्कालीन प्रसंग निर्माण झाल्यास त्वरित वरील क्रमांकांवर संपर्क साधावा आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन नगर परिषद प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.