Lonavala Traffic Police Action Pudhari
पिंपरी चिंचवड

Lonavala Traffic Police Action: लोणावळ्यात फॅन्सी नंबर प्लेट, कर्णकर्कश बुलेटवर पोलिसांचा दणका; ३९ वाहनांवर कारवाई

वाहतूक पोलिसांकडून ४४ हजारांचा दंड वसूल; काळ्या काचा, नंबर झाकणाऱ्या वाहनांवरही कारवाई

पुढारी वृत्तसेवा

लोणावळा: लोणावळ्यात फॅन्सी नंबर प्लेट असणाऱ्या दुचाकी व कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटच्या सायलेन्सरवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. लोणावळा शहर पोलिसांनी सोमवारी राबवलेल्या मोहिमेत 39 वाहनांवर कारवाई केली असून, 44 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

मागील काही महिन्यांपासून लोणावळा शहर पोलिस वाहतूक शाखेकडून वारंवार अशा कारवाया होत असतानादेखील अनेक तरुण व महाविद्यालयीन विद्यार्थी आपल्या बुलेट गाड्यांना कर्णकर्कश आवाज करणारे व सायलेन्सरमध्ये बदल करून बाजारपेठ, शाळा, महाविद्यालयाच्या परिसरामध्ये शांततेचा भंग करत आहेत. अनेक चालक आपल्या गाड्यांचे नंबर प्लेट फॅन्सी बनवत आहेत. तर, अनेक जण नंबर प्लेटच्या जागांवर दादा, भाऊ अशी नावे किंवा बैल जोडी यांची चित्रे लावत असल्याचे निदर्शनास आले होते. यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली.

काळ्या काचा लावणाऱ्यांवरही कारवाई

मागील काळामध्ये दुचाकीच्या सायलेन्सरवर लोणावळा शहर पोलिसांनी बुलडोझर फिरवत त्यांचा चुराडा केला होता. आतादेखील गाड्यांचे सायलेन्सर जप्त केले जात आहेत व त्यांच्यावर पुढील काळात बुलडोजरदेखील फिरवला जाणार आहे. पोलिस प्रशासनाकडून वारंवार सूचना देऊन व कारवाई करूनदेखील काही दुचाकीचालक नियम व कायद्याचा वारंवार भंग करत आहेत.

बहुतांश दुचाकीचालक हे महाविद्यालयीन विद्यार्थी व युवक असल्याचे निदर्शनास येत आहे. अनेक चारचाकी वाहनांच्या काळ्या काचावरदेखील पोलिसांनी कारवाया केल्या आहेत. चारचाकी चालक हे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा दंड वाचवण्यासाठी नंबर प्लेटवर टेप लावून नंबर झाकत असल्याचेदेखील आढळून आले होते. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरून प्रवास करणाऱ्या वाहनांच्या बाबतीत असे प्रकार सर्रासपणे दिसून येत आहेत, असे लोणावळा शहरचे पोलिस निरीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले.

टोलनाक्यांवर सवलतीसाठी वाहनांवर स्टीकर

सचिन पाटील म्हणाले, की अनेक चारचाकी वाहनांवर वेगवेगळ्या प्रकारचे स्टीकर लावले जात आहेत. अशा वाहनांचीदेखील पडताळणी करत, त्यांच्यावरदेखील कारवाई केली जाणार आहे. काही दिवसांपूर्वी अशीच स्टीकर लावलेली एक चारचाकी गाडी पोलिसांनी जप्त केली होती. त्याच पद्धतीने कारवाया केल्या जाणार आहेत. अनेक चारचाकी वाहनचालक पोलिस कारवाया व टोलनाक्यांवर सवलत मिळावी, याकरिता कोणाच्यातरी नावाचे स्टीकर आपल्या गाड्यांवर लावत आहेत. आपण कोणत्यातरी नेत्याचे पुढाऱ्याचे जवळचे असल्याचे भासवत आहेत. पोलिसांनी मात्र अशा वाहनांवरदेखील कारवाई मोहीम हाती घेतली आहे, दोषी आढळणाऱ्यांवर ही कारवाई केली जाणार आहे. पुणे, पिंपरी भागातदेखील अशा वाहनांवर आयुक्तालयाच्या माध्यमातून कारवाई मोहीम हाती घेण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT