लोणावळा: दिवसेंदिवस वाढणारे सायबर गुन्हे, अमली पदार्थांचे जाळे आणि भीती दाखवून केली जाणारी डिजिटल अरेस्ट यासारख्या गंभीर प्रकारांपासून नागरिक व विद्यार्थ्यांनी सतर्क राहण्याची गरज आहे, असे प्रतिपादन खंडाळा ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सागर अरगडे यांनी केले.
देशात दररोज १०० कोटींची सायबर फसवणूक
देशात सायबर गुन्ह्यांद्वारे दररोज सुमारे १०० कोटी रुपयांची नागरिकांची फसवणूक होत आहे. याशिवाय महाविद्यालयीन परिसरात होणारे रॅगिंग आणि त्यातून होणारी मानसिक पिळवणूक यांवरही विद्यार्थ्यांनी वेळीच आवाज उठवला पाहिजे, असे पोलिस निरीक्षक सागर अरगडे यांनी सांगितले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. नरेंद्र देशमुख यांनी विद्यार्थ्यांना इंटरनेट व सोशल मीडियाचा वापर करताना घ्यावयाच्या काळजीबद्दल मोलाचा सल्ला दिला.
याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. विलास पाटील, पोलिस पाटील संघटना प्रमुख संजय जाधव, परीक्षा विभागप्रमुख डॉ. राजेंद्र देवरे यांच्यासह लोणावळा व कार्ला परिसरातील ग्रामीण भागातील पोलिस पाटील, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. पराग कुलकर्णी यांनी केले, तर प्रा. धनराज पाटील यांनी आभार मानले.
ओटीपी कोणालाही देवू नका
लोणावळा एज्युकेशन ट्रस्टच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये आयोजित विशेष प्रबोधन कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी त्यांनी विद्यार्थी, शिक्षक आणि परिसरातील पोलिस पाटलांना मार्गदर्शन केले. मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक सागर अरगडे यांनी सायबर भामट्यांच्या विविध क्लृप्त्यांची सविस्तर माहिती दिली. भामटे नेमकी कशी फसवणूक करतात, हे सांगताना त्यांनी सांगितले, की जास्त परताव्याचे किंवा व्याजाचे आमिष दाखवणे, लोकांचा विश्वास संपादन करून नंतर भीती दाखवून पैशांची मागणी केली जाते.
तसेच, फोनवर बोलून ओटीपी मागणे, बनावट यूपीआय आणि क्यूआर कोडद्वारे पैसे उकळणे, अनधिकृत किंवा चुकीच्या लिंक पाठवून डेटा हॅक केला जातो. फ्री जॉब ऑफर किंवा घरबसल्या कमाईच्या नावाखाली जाळ्यात ओढणे, डिजिटल अरेस्टची भीती दाखवून तसेच सेक्सटॉर्शनच्या माध्यमातून ब्लॅकमेल करून पैसे उकळण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत.