लोणावळा: शहरामध्ये मागील आठवडाभरापासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे भुशी धरणाच्या सांडव्यावरून अतिशय वेगाने पाणी वाहत आहे. असे असताना धरणाच्या पायऱ्यांवर बसून पर्यटक जीवघेणा वर्षाविहार करत असल्याचे चित्र शनिवार व रविवारी पाहायला मिळाले. पाण्याच्या प्रवाहात बसून हे पर्यटक भिजण्याचा आनंद घेत होते.
लोणावळ्यात जोरदार पाऊस सुरू असून, शहरावर पुराचे संकट आहे. एकीकडे स्थानिकांना या पावसामुळे झोप लागत नसताना दुसरीकडे पर्यटक मात्र हजारोंच्या संख्येने लोणावळा शहरात दाखल होत या डोंगर दऱ्यांमधून कोसळणारे धबधबे, धरणाच्या सांडव्यावरून व पायऱ्यांवरून वाहणारे पाणी यामध्ये बसून कोसळणाऱ्या पावसात भिजण्याचा आनंद घेत आहेत.
लोणावळा शहर हे पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण असल्यामुळे या ठिकाणी दर शनिवार व रविवारी वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी तसेच, धबधबे व धरणे या परिसरात फिरण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात.
लोणावळ्याची अर्थव्यवस्था ही पर्यटनावर अवलंबून आहे. ही वस्तुस्थिती असली तरी येथे येणाऱ्या पर्यटकांनी स्वतःच्या जीविताची काळजी घेणेदेखील महत्त्वाचे आहे. एखादी दुर्दैवी घटना घडल्यानंतर त्याचा दीर्घकालीन परिणाम हा त्या परिसरातील पर्यटनस्थळांवर व तेथे व्यवसाय करणाऱ्या स्थानिक व्यवसायांवर होत असतो. याचादेखील विचार पर्यटकांनी धोकादायक पर्यटन करताना करणे गरजेचे आहे.