Lonavala Encroachment Drive Protest Pudhari
पिंपरी चिंचवड

Lonavala Encroachment Drive: अतिक्रमण कारवाईविरोधात लोणावळेकरांचा एल्गार; शहर बंदला संमिश्र प्रतिसाद

नगरपरिषदेच्या कथित भेदभावपूर्ण कारवाईचा निषेध; व्यापारी आणि नागरिकांचे संचेती लॉन्स येथे लाक्षणिक उपोषण

पुढारी वृत्तसेवा

लोणावळा: लोणावळा नगरपरिषद प्रशासनाकडून शहरात सुरू असलेल्या अतिक्रमणविरोधी कारवाईच्या पद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करीत सोमवारी (दि. २३) नागरिकांनी रस्त्यावर उतरून प्रशासनाविरोधात जोरदार एल्गार पुकारला. प्रशासनाच्या या मनमानी कारभाराचा आणि कारवाईतील कथित भेदभाव व अरेरावीचा निषेध नोंदविण्यासाठी शहरात एकदिवसीय 'लोणावळा बंद' पुकारण्यात आला होता. याला शहरात संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळाला.

सोमवारी संचेती लॉन्स येथे व्यापारी आणि नागरिकांच्या वतीने लाक्षणिक उपोषण करण्यात आले. एकीकडे हे उपोषण सुरू असताना दुसरीकडे लोणावळा नगरपरिषदेने कारवाई सुरूच ठेवली होती. लोणावळा शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी ही कारवाई सुरू असल्याचे नगरपरिषद प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

पूर्वसूचना न देता कारवाई

गेल्या काही दिवसांपासून नगरपरिषदेकडून शहरातील वाहतूक कोंडी, पादचाऱ्यांची सुरक्षितता आणि अनधिकृत बांधकामांवर हातोडा मारत अतिक्रमणविरोधी मोहीम राबवली जात आहे. मात्र, या मोहिमेच्या अंमलबजावणीवरून स्थानिक व्यापारी व नागरिकांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. पूर्वसूचना न देता अचानक कारवाई करणे, नागरिकांना आपले म्हणणे मांडण्यास पुरेसा वेळ न देणे आणि काही ठरावीक ठिकाणीच निवडक स्वरूपात कारवाई करणे, असे गंभीर आरोप आंदोलनकर्त्यांनी प्रशासनावर केले आहेत.

सर्वसमावेशक कारवाईची मागणी

वाहतूक सुरळीत होण्यासाठी अन् रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी अतिक्रमणे हटवणे आवश्यक असले, तरी प्रशासनाने सर्वांना समान नियम लावावेत, अशी ठाम भूमिका आंदोलकांनी मांडली. केवळ नामफलक काढून किंवा काही व्यावसायिकांना लक्ष्य करून अतिक्रमणाचा प्रश्न सुटणार नाही. शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी सर्व प्रकारच्या अतिक्रमणांवर पारदर्शक आणि सरसकट कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली. तसेच, विकासाच्या नावाखाली सामान्य नागरिक व व्यापाऱ्यांवर अन्याय न करता प्रशासनाने संवादाचा मार्ग स्वीकारून कायदेशीर प्रक्रियेचे पालन करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष

संचेती लॉन्स येथे पार पडलेल्या या लाक्षणिक उपोषणात शहरातील व्यापारी, विविध संस्थांचे प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या बंद व आंदोलनामुळे नगरपरिषदेच्या अतिक्रमण कारवाईचा मुद्दा चांगलाच ऐरणीवर आला आहे. आता या आंदोलनानंतर नगरपरिषद प्रशासन काय भूमिका घेते आणि यावर काही ठोस तोडगा निघतो का? याकडे संपूर्ण लोणावळेकरांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT