Lonavala Encroachment Drive Pudhari
पिंपरी चिंचवड

Lonavala Bandh: अतिक्रमण कारवाईविरोधात लोणावळा बंदची हाक; व्यापारी, नागरिकांचा सोमवारी सहभाग

सकाळी ७ ते दुपारी ३ पर्यंत दुकाने बंद; सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात उपोषण

पुढारी वृत्तसेवा

लोणावळा: लोणावळा नगर परिषद प्रशासनाकडून शहरात सुरू असलेल्या अतिक्रमणविरोधी कारवाईच्याविरोधात आता नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. प्रशासनाकडून कोणतीही पूर्वसूचना न देता, मनमानी पद्धतीने तसेच अरेरावीच्या भूमिकेतून कारवाई केली जात असल्याचा आरोप करत नागरिकांनी सोमवारी (दि. २३) एकदिवसीय लोणावळा बंदची हाक दिली आहे. या बंदला नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सोमवारी सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत शहरातील दुकाने व व्यावसायिक व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच, सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे नागरिकांच्या वतीने उपोषण करण्यात येणार आहे. शहरातील वाहतूक कोंडी कमी व्हावी, रस्ते मोकळे व्हावेत आणि नागरिकांना तसेच पर्यटकांना वाहतुकीचा त्रास होऊ नये, याबाबत कोणाचेही दुमत नाही. मात्र, शहरातील वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्यास केवळ अतिक्रमणेच जबाबदार आहेत का? याचाही प्रशासनाने विचार करणे आवश्यक आहे.

पूर्वसूचना न देता कारवाई

शहरातील अनियंत्रित वाहतूक, अपुरी पार्किंग व्यवस्था, नियोजनाचा अभाव आणि प्रशासनाकडून वेळोवेळी योग्य उपाययोजना न होणे यांसारख्या बाबीही तितक्याच जबाबदार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईला नागरिकांचा विरोध नसून, कारवाई करताना सर्वांना समान न्याय मिळावा, कोणावरही अन्याय होऊ नये, पूर्वसूचना द्यावी आणि कायदेशीर प्रक्रिया पार पाडून पारदर्शक पद्धतीने कारवाई करावी, अशी नागरिकांची भूमिका आहे.

मात्र, सध्या सुरू असलेल्या कारवाईच्या पद्धतीमुळे सामान्य नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये नाराजी वाढत आहे. प्रशासनाने शहराच्या विकासाच्यादृष्टीने वाहतूक नियोजन, पार्किंग व्यवस्था आणि अतिक्रमण नियंत्रण याबाबत सर्वसमावेशक धोरण राबवावे, अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे.

प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष

या पार्श्वभूमीवर सोमवारी पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये लोणावळ्यातील नागरिक, व्यापारी आणि व्यावसायिकांनी सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या बंदच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधून नागरिकांच्या भावना आणि मागण्या मांडण्यात येणार असून, प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे आता संपूर्ण लोणावळेकरांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT