मिलिंद कांबळे
पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेचा निवडणुकीचा बार दिवाळीनंतर उडणार आहे. त्यासाठी प्रमुख पक्षातील अनुभवी माजी नगरसेवक व पदाधिकारी हे तिकिटापासून स्थायी समितीचे सभापतीपद तसेच, महापौर व इतर महत्त्वाच्या पदासाठी आतापासून लॉबिंग करत असल्याची चर्चा आहे. मागे थोडक्यात हुकलेले स्थायीचे सभापतीपद यंदा हवेच, यासाठी स्थानिक तसेच, वरिष्ठ नेत्यांकडे आग्रह धरला जात आहे.
फेबुवारी 2017 च्या निवडणुकीत भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसकडून महापालिकेची सत्ता हस्तगत केली. भाजपाचे नेते आमदार कै. लक्ष्मण जगताप तसेच, आ. महेश लांडगे यांनी शिफारस केल्यानुसार महापौर, स्थायी समिती सभापती व इतर महत्त्वाच्या पदावर आपल्या मतदारसंघातील नगरसेवकांना संधी दिली गेली. त्यांनी दिलेल्या नावांवर वरिष्ठांकडून शिक्कामोर्तब केले जात होते. (Latest Pimpri News)
तो अनुभव लक्षात घेऊन यंदा निवडणुकीपूर्वीपासून अनेक अनुभवी माजी नगरसेवक, पदाधिकारी व इच्छुक फिल्डींग लावून आहेत. स्थायी समितीचे सभापतीपद आणि महापौरपद व इतर प्रमुख पदांसाठी अनेक जणांनी शहरातील लोकप्रतिनिधींपासून वरिष्ठ नेतेमंडळी व पदाधिकाऱ्यांकडे जोर लावला आहे. त्या पदासाठी वेगवेगळ्या माध्यमातून आपली नावे पुढे केले जात आहेत.
मी कसा योग्य हे नेत्यांना समजावून सांगितले जात आहे. तसेच, पक्षातील मात्र विरोधातील प्रबळ इच्छुकाला पद न देण्याबाबतही वेगवेगळ्या कौशल्याचा वापर केला जात आहे. त्याला पद देऊ नका, त्याने पक्षाला अनेकदा अडचणी आणले, पक्ष विरोधी काम करतो, तो विरोधकांसोबत सामील आहे, असे आरोप करीत वरिष्ठांचे काम भरले जात आहेत.
तसेच, स्थायी समिती सदस्य पदावरही अनेकांचा डोळा आहे. उपमहापौर, सत्तारूढ गटनेतेपद तसेच, शिक्षण, विधी, क्रीडा, महिला व बालकल्याण या विषय समितीचे सभापतिपदासाठीही काही जण अडून बसलेत. मानाचे पद मिळावे म्हणून इच्छुक वेगवेगळ्या प्रकारे लॉबिंग करीत आहेत.
या पदासाठी सत्तेतील भाजपा तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) व शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षात अनेक जण इच्छुक आहे. तसेच, महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे,काँग्रेस व इतर पक्षांतील इच्छुकही त्या मानाच्या पदासाठी तयारी करीत आहेत. ते मानाचे पद मलाच मिळायला हवे. दांडगा अनुभव, पक्षासाठी केलेली कामे पाहता पद हवे, अशी आग्रही मागणी स्थानिकपासून राज्य पातवळीवरील नेत्यांकडे केली जात आहे.
महत्त्वाचे पद असल्याने रस्सीखेच
महापालिकेत महापौर पद हे सर्वोच्च स्थानावरील पद आहे. ते शहराचे पहिले नागरिक असतात. महापौरांचे निर्णय आयुक्तांसह संपूर्ण महापालिकेवर लागू होतात. त्यांना शहरात तसेच, राज्यासह देशात मान मिळतो. देशातील तसेच, आंतरराष्ट्रीय अभ्यास दौऱ्याची तसेच, विविध कार्यक्रमांना हजेरी लावण्याची संधी त्यांना मिळते.
राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री, मंत्री, मोठे अधिकारी आदी प्रमुख व्यक्तींचे स्वागत करण्याचा मान त्यांनाच मिळतो. त्यानंतर महापालिकेत स्थायी समितीचे सभापतीपद हे मोठे पद आहे. महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या त्यांच्याकडे असल्याने आर्थिक दृष्टीकोनातून हे पद सर्वोच्च आहे. सभापतीने कामास मंजुरी देऊन ग्रीन सिग्नल दिल्यानंतर कामे मार्गी लागतात अन्यथा नाही. या दोन पदांसाठी अनेक जण इच्छुक आहेत.
आरक्षित पदावर महापौरपद भूषविणारे
पिंपरी-चिंचवड महापालिकेत आरक्षणानुसार हे नगरसेवक महापौर झाले आहेत. त्यात प्रकाश रेवाळे (इतर मागास प्रवर्ग), मंगला कदम (महिला खुला प्रवर्ग), डॉ. वैशाली घोडेकर (नागरिकांचा मागास प्रवर्ग), अपर्णा डोके (नागरिकांचा मागास प्रवर्ग), योगेश बहल (खुला प्रवर्ग), मोहिनी लांडे (महिला खुला प्रवर्ग), शकुंतला धराडे (अनुसूचित जमाती), नितीन काळजे (नागरिकांचा मागास प्रवर्ग), राहुल जाधव (नागरिकांचा मागास प्रवर्ग) आणि उषा ढोरे (महिला खुला प्रवर्ग) यांचा समावेश आहे. अनुसूचित जातीचे (एससी) आरक्षण शिल्लक आहे.
युती, आघाडीबाबत उत्सुकता
महायुती आणि महाविकास आघाडी अशी एकत्रितपणे निवडणूक लढली जाणार की स्वतंत्रपणे, याची उत्सुकता लागली आहे. लोकसभा व विधानसभेत युती व आघाडी झाली होती. महापालिका निवडणुकीत माजी नगरसेवक व इच्छुकांची संख्या मोठी आहे. प्रमुख पक्षात तर, इच्छुकांची रांग लागली आहे. त्यामुळे युती व आघाडी न करता निवडणूक लढावी, अशी स्थानिक पदाधिकाऱ्यांचे मत आहे. तसेच, वरिष्ठांकडून अद्याप स्पष्ट संकेत दिले जात नसल्याने युती व आघाडीबाबत इच्छुकांमध्ये संभम निर्माण झाला आहे.