

पिंपरी: पावसाळ्यामध्ये कीटकजन्य आजारात वाढ होत असते. त्यानंतर ढगाळ वातावरण, मध्येच कडक ऊन आणि पाऊस यामुळे शहरात सर्दी, खोकला, तापाने आजारी पडणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. पालिकेचे दवाखाने, रुग्णालये आणि खासगी रुग्णालयांत येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. सप्टेंबर महिन्यात आत्तापर्यंत 8,964 हून अधिक रुग्ण आढळले आहेत.
अधूनमधून येणारा पाऊस व बदलत्या वातावरणामुळे संसर्गजन्य आजारांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे शहरातील दवाखान्यात रुग्णांची गर्दी होत आहे. गेल्या काही दिवसांपासून कडाक्याचे ऊन पडते तर मधूनच कधी थंडी जाणवते, तर कधी वातावरण ढगाळ होऊन पाऊस पडायला लागतो. या बदलत्या हवामानाचा मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे. (Latest Pimpri News)
गेल्या आठ दिवसांपासून वातावरणात झालेल्या बदलामुळे अनुत्साही वाटणं, डोकं दुखणं अशा आजारांत वाढ झाली आहे. अचानक वाढलेला गारवा आरोग्याला बाधक ठरत आहे. मोठ्यापासून ते लहानांपर्यंत सर्दी, खोकल्याचे प्रमाण वाढले आहे.
ठिकठिकाणी साचलेले पाणी
पावसामुळे शहरात ठिकठिकाणी खड्डे, डबक्यांमध्ये कचरा आणि इतर गोष्टी तशाच साचून राहिल्याने पाणी वाहून जाण्याची प्रक्रिया थांबल्यामुळे त्याचा परिणाम म्हणून संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढत आहे. परिणामी कीटकांमुळे उद्भवणारे आजार वाढत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या आजाराकडे दुर्लक्ष केले तर तो प्राणघातक ठरू शकतो. तो होऊ नये, यासाठी काळजी घेणे अधिक गरजेचे आहे.
उपाययोजना :
1) पावसाळ्यातील कुठल्याही सर्दी, खोकला व तापासारख्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. डॉक्टरांचा त्वरित सल्ला घ्या.
2) घरातील लहान मुलांचे लसीकरण झाले आहे की नाही, हे तपासून बघणे.
3) घरातील मोठ्या माणसांसाठीदेखील हिपेटायटीस ए.बी. कॉलरा, टायफॉॅईड, स्वाइन फ्ल्यू आदी लसी घेतल्या गेल्या की नाही ते बघणे.
4) घराभोवती पाण्याचे डबके साचणार नाही, सांडपाण्याचा व्यवस्थित निचरा होईल यासाठी लागणारी डागडुजी करणे.
पावसाळ्यातील पथ्ये
1) पावसाळ्यात पाणी गढूळ येते. पाणी गाळून, उकळून प्यावे, वॉटर प्युरिफायरव्यतिरिक्त पाणी उकळलेले असल्यास सुरक्षा आणखी वाढते.
2) उघड्यावरील पदार्थ हॉटेलमधील खाणे शक्यतो टाळावे.
3) सर्दी, पडसे, खोकला, उलट्या, जुलाब यासारखी लक्षणे पावसाळ्यात स्वत:च्या अनुभवाने बरे करण्याच्या फंदात पडू नये. डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व औषधे घ्यावीत.
4) एका रुग्णासाठी आणलेले औषध दुसऱ्यास रुग्णास देऊ नये.
वातावरण बदलल्यामुळे सर्दी, ताप, खोकला रुग्णाची संख्या वाढली आहे. यामध्ये काही डेंग्यूचे आणि मलेरियाचे रुग्णदेखील आहेत. सध्याचे वातावरण विषाणूजन्य आजारांना पोषक वातावरण आहे. अंगदुखी, ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण येत आहेत. त्यामुळे दुर्लक्ष न करता त्वरित वैद्यकीय उपचार करावेत.
- डॉ. किशोर खिलारे (अध्यक्ष, जनसेवा आरोग्य मंच)