लोणावळा : लोणावळ्यातील लायन्स पॉईंट येथे शनिवारी (दि. 6) सकाळी सहा ते सात वाजण्याच्या सुमारास कारने टेम्पोला जोरदार धडक दिल्याने कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला असून, टेम्पोचालकदेखील जखमी झाला आहे.
दर्शन शंकर सुतार (वय 21) व मयूर वेंगुर्लेकर (वय 24, दोघेही रा. म्हापसा, गोवा) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. तर, टेम्पोचालक भीमा विटेकर (वय 60, रा. वाकसई, मावळ) हे जखमी झाले आहेत. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जलसा रिसॉर्ट येथून लायन्स पॉईंटकडे भरधाव वेगात निघालेली कार (जीए 03 एएम 0885) समोरून येणार्या टेम्पोला (एमएच 14 जेएल 5525) धडकल्याने कारमधील दोन्ही तरुणाचा जागीच मृत्यू झाला.
म्हापसा गोवा येथून लोणावळ्यात 14 तरुण तीन कारमधून फिरायला आले होते. गुरुवारी ही सर्वजण लोणावळ्यात आले होते. घुसळखांब येथील एका हॉटेलमध्ये हे तरुण मुक्कामी होते. आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास योगेश सुतार व मयूर वेंगुर्लेकर हे दोघेजण स्विफ्ट कारमधून लायन्स पॉईंट येथील निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी हॉटेलमधून बाहेर पडले व जेमतेम दीड किमी अंतरावर हा भीषण अपघात झाला.
गोवा येथून आलेले हे सर्व जण गोव्यात टॅक्सी चालवतात. लोणावळ्यात ते फिरायला आले होते. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास लोणावळा ग्रामीणचे पोलिस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.