नवलाख उंबरे : राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यासाठी लाडक्या बहिणी प्रयत्न करीत आहेत. मात्र, एकाच वेळी मोठ्या संख्येने ई केवायसी प्रक्रिया केली जात असल्याने साईटवर लोड येत आहे. त्यामुळे अनेकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. तसेच, यासाठी लाडक्या बहिणींना ई- सेवा केंद्राच्या चकरा माराव्या लागत आहेत. (Latest Pimpari chinchwad News)
लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला मिळणारे दीड हजार रुपये मिळत आहेत. सरकारने दोन महिन्यांत ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितले आहे. त्यानंतर खात्यात पैसे जमा होणे बंद होणार आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणी जवळील केंद्रावर फेऱ्या मारताना दिसत आहेत.
केंद्रांवर महिलांची गर्दी
सरकारने आधारकार्ड केवायसी करणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे गावोगावी असलेल्या केंद्रांवर महिलांची मोठी गर्दी होत आहे. सकाळपासूनच महिलांची रांग लागत आहे, परंतु केवायसी प्रक्रियेस बराच वेळ लागतो आणि यामध्ये वारंवार तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याने महिलांची चांगलीच दमछाक होत आहे. दररोजची धावपळ, खर्चाचा ताण आणि पैशांची प्रतीक्षा यामुळे महिलांच्या मनात नाराजी वाढत आहे.
लाडकी बहीण योजना महिलांच्याआर्थिक सक्षमीकरणासाठी महत्त्वाची मानली जाते. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे लाभार्थ्यांना मिळणारा लाभ वेळेवर मिळत नसल्याने या योजनेचा हेतू कितपत साध्य होतो आहे, याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
सरकारने दिलेल्या आदेशानुसार आम्ही केवायसी प्रक्रिया सुरू ठेवली आहे. मात्र, नेटवर्क समस्या, सर्व्हर डाऊन अशा तांत्रिक कारणांमुळे गती मंदावते. तरीही शक्य तितक्या महिलांची प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.विशाल रिठे, सेवा केंद्र कर्मचारी
आम्ही दररोज रांगेत उभे राहतो, पण तांत्रिक कारणामुळे काम होत नाही. पुन्हा दुसऱ्या दिवशी यावे लागते. घरकाम, मुलांची जबाबदारी सोडून हे चकरा माराव्या लागत आहेत.सुप्रिया लोंढे, स्थानिक महिला
नेटवर्कची समस्या
कित्येक महिलांना ही प्रक्रिया माहिती नसल्याने त्यांना ई केवायसी नेमकी कशी करावी हे कळत नाही. लाडक्या बहिणींसमोर संभ्रम निर्माण झाला आहे. नवलाख उंबरे परिसरातील इ सेवा केंद्र चालकांनी सांगितले, की सरकारने दिलेल्या आदेशानुसार आम्ही केवायसी प्रक्रिया सुरू ठेवली आहे. मात्र, नेटवर्क समस्या, सर्व्हर डाऊन अशा तांत्रिक कारणांमुळे गती मंदावत आहे. तरीही शक्य तितक्या महिलांची ई केवायसी प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.