खराळवाडी: पिंपरीतील महापालिकेच्या खराळवाडी माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना गेल्या काही दिवसांपासून चिखलातून वाट काढत शाळेत जावे लागत आहे. सततच्या रिमझिम पावसामुळे शाळेच्या मैदानातील सखल भागात पाणी साचले असून, तेथे मोठ्या प्रमाणात चिखल झाला आहे. त्यामुळे लहान विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करताना मोठी कसरत करावी लागत असून, पालकांमध्येही नाराजी व्यक्त होत आहे.
गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे शाळेच्या प्रवेशमार्गावरील मैदान चिखलमय झाले आहे. विद्यार्थ्यांना पाय घसरून पडण्याची भीती कायम असून, अनेकांच्या गणवेशासह बूटही चिखलाने माखत आहेत. विशेषतः प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
या समस्येवर तातडीने उपाययोजना करत चिखल झालेल्या ठिकाणी मुरूम टाकून सुरक्षित मार्ग तयार करावा, अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे. दररोज मुलांना चिखलातून चालत शाळेत जावे लागते. अनेक वेळा पाय घसरून पडण्याच्या घटना घडतात. मुलांच्या सुरक्षिततेसाठी महापालिकेने तातडीने मुरूम टाकून मैदानाचा मार्ग सुस्थितीत करावा. विद्यार्थ्यांची गैरसोय थांबविणे आवश्यक आहे.एक पालक.
सततच्या पावसामुळे मैदानातील सखल भागात पाणी साचून चिखल झाला आहे. याबाबत महापालिकेच्या संबंधित विभागाला माहिती देण्यात आली आहे. पत्रवहार व पाठपुरावा केला आहे. इंजिनिअर येऊन पाहाणी करून गेले आहेत. येत्या एक दोन दिवसांत मुरुम टाकण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत आवश्यक उपाययोजना करण्यासाठी पाठपुरावा सुरू असून, लवकरच मुरूम टाकून समस्या दूर करण्यात येईल.एन. के. भोये, मुख्याध्यापक, महापालिका खराळवाडी माध्यमिक शाळा