खराळवाडी: खराळवाडी परिसरातील गांधीनगर भागात मागील काही दिवसांपासून नागरिक अतिसार, उलट्यांनी बेजार झाले आहेत. दरम्यान, महापालिकेकडून होणारा दूषित पाणीपुरवठा याला जबाबदार असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे. गांधीनगर भागात नळाद्वारे पाण्यासोबत गाळ येत असल्याने पाणी पिण्याची इच्छा होत नाही. महापालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.
मागील काही दिवसांपासून खराळवाडी, गांधीनगर परिसरात दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत. महापालिकेच्या संबंधित विभागाकडून मात्र याबाबत ठोस उपाययोजना करण्यात येत नसल्याने दररोज रुग्णसंख्येत वाढ होत आहे. खराळवाडी उपनगर दवाखान्यामध्ये दररोज गर्दी दिसत आहे. त्यातील बहुतांश रुग्ण हे अतिसार, उलट्यांनी त्रस्त असल्याचे निदर्शनास येत आहे. दरम्यान दवाखान्यात खर्च करून वैतागलेल्या नागरिकांना पिण्यासाठी पाणी विकत घ्यावे लागत असल्याने कर भरूनही नागरिकांना नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे.
शुद्ध पाणीपुरवठ्याची गरज
दूषित पाणीपुरवठ्याची समस्या सध्या गंभीर बनली आहे. महापालिका पाणीपुरवठा विभागाने याबाबत गांभीर्याने दखल घेऊन तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करून पाणी दूषित होण्यामागील कारणांचा शोध घेऊन योग्य कार्यवाही करणे आवश्यक आहे. खराळवाडी परिसरातील गांधीनगर भागातील काही नागरिकांनी दूषित पाणी येत असल्याच्या तक्रारी महापालिकेला केल्या तरी मात्र महापालिका प्रशासनाने याची दखल घेतली नाही.
त्यामुळे दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे खराळवाडी गांधीनगर परिसरात नागरिकांमधून चर्चा केली जात आहे. महापालिकेने शुद्ध आणि पुरेसा पाणीपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.
महापालिका प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे कधी कमी दाबाने पाणीपुरवठा होतो, तर कधी दूषित पाणीपुरवठा होतो. महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष वेधून काम करण्याची गरज आहे.रामदास नवगिरे, नागरिक.
मागच्या काही महिन्यांपूर्वी नळाद्वारे स्वच्छ पाणीपुरवठा केला जात होता; परंतु काही दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत असल्याने येथील नागरिकांवर आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. तरी महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे.शकुंतला हिरे, गृहिणी.