Water  Pudhari
पिंपरी चिंचवड

Kasarwadi Water Supply: कासारवाडीतील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी १.१६ कोटींचा खर्च; महापालिकेची निविदा मंजूर

दोन वर्षांसाठी जलक्षेत्र परिचालन, देखभाल-दुरुस्तीचे काम; मराठी भाषा सप्ताहासाठी दीड कोटी, गणेश विसर्जन रथांसाठी ७२.५० लाख

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने संपूर्ण शहरात दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. कासारवाडी येथील रेल्वे गेटखालील परिसरात पुरवठा सुरळीत करण्यासाठी पाणीपुरवठा संचालनावर 1 कोटी 16 लाख रुपये खर्च केला जाणार आहे.

कासारवाडी येथील रेल्वे गेटखालील परिसरात पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. समन्यायिक पद्धतीने सुरळीत पाणीपुरवठा करणे आवश्यक होते. रेल्वे गेटखालील भागाचे जलक्षेत्राचे परिचालन करणे आणि देखभाल व दुरूस्ती या कामासाठी पाणीपुरवठा विभागाने 1 कोटी 18 लाख 24 हजार 665 रुपये खर्चाची निविदा काढली हेती.

त्या कामासाठी पाच ठेकेदारांच्या निविदा प्राप्त झाल्या होत्या. त्यातील भारतीय, सावित्रीबाई, साई आणि अथर्व अशा चार महिला स्वयंरोजगार संस्था ठेकेदार पात्र ठरले. त्यातील भारतीय महिला संस्थेचा 1.89 कमी दराची व 1 कोटी 16 लाख 1 हजार 642 रुपये खर्चाची निविदा स्वीकृत करण्यात आली आहे. या कामाची मुदत 2 वर्षे आहे. या खर्चास स्थायी समितीने ऐनवेळी मान्यता दिली आहे.

अभिजात मराठी भाषा सप्ताहासाठी दीड कोटीचा खर्च

महापालिकेच्या वतीने अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा केला जाणार आहे. त्या निमित्त 3 ते 9 ऑक्टोबर या कालावधीत शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. त्यासाठी तब्बल दीड कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्या खर्चास स्थायी समितीने ऐनवेळी मान्यता दिली आहे.

गणेशोत्सवातील विसर्जन रथ तब्बल 72 लाख 50 हजारांचा

पिंपरी-चिंचवड शहरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नागरिकांकडून गणेशमूर्तीचे संकलन करून त्यांचे संकलन केंद्रात साठवण करण्यात येते. त्या सर्व मूर्ती एकत्रित विसर्जन करण्यासाठी वाहनांतून मोशी खाण येथे नेल्या जातात. त्यासाठी सर्व 32 प्रभागांतील विसर्जन रथ नेमण्यात आले आहेत. गणेशोत्सव काळात आठ दिवस विसर्जन रथ पुरवण्यासाठी एकूण 72 लाख 50 हजार रुपये खर्च केला जाणार आहे. एका वाहनास एका दिवसाला 28 हजार 243 रुपये खर्च आहे. या पर्यावरण अभियांत्रिकी विभागाच्या प्रस्तावावरील खर्चास स्थायी समितीने आयत्या वेळी मान्यता दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT