Kasarwadi Swimming Pool Pudhari
पिंपरी चिंचवड

Kasarwadi Swimming Pool: पाच महिन्यांनंतर कासारवाडीचा जलतरण तलाव सुरू; अस्वच्छता आणि सुरक्षेच्या त्रुटींमुळे नागरिकांची नाराजी

इलेक्ट्रिक रूममध्ये पाणी, २६ बाथरूममध्ये नळांचा अभाव; झाडाझुडपांमुळे सापांचा धोका, त्रुटी दूर करण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

पिंपळे गुरव: पिंपरी-चिंचवड महापालिकेने केलेल्या पाणीकपातीमुळे गेल्या जून महिन्यापासून बंद असलेला कासारवाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जलतरण तलाव तब्बल पाच महिन्यांनंतर सोमवार, (दि. २३) पासून पुन्हा नागरिकांसाठी खुला होणार आहे. मात्र, तलाव सुरू होण्यापूर्वीच येथील असुविधा, अस्वच्छता आणि सुरक्षेच्या प्रश्नांमुळे महापालिका प्रशासनाच्या तयारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पाच महिन्यांचा कालावधी मिळूनही मूलभूत सुविधांची कामे पूर्ण झाली नसल्याने जलतरणपटूंच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एकीकडे तलाव सुरू करण्याची तयारी सुरू असताना दुसरीकडे सुविधांचा अभाव कायम असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

इलेक्ट्रिक रूममध्ये पाणी; शॉक लागण्याचा धोका

तलावाच्या इलेक्ट्रिक मॉनिटरिंग रूममध्ये मोठ्या पाइपामधून पाणी लिकेज होत आहे. यामुळे रूममध्ये पाणी साचत आहे. विद्युत उपकरणे असलेल्या खोलीत पाणी साचणे ही गंभीर बाब असून, शॉर्टसर्किट किंवा विजेचा धक्का बसण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे तलाव सुरू करण्यापूर्वी पाण्याचा निचरा करून विद्युत यंत्रणेची तांत्रिक तपासणी करणे आवश्यक आहे.

बाथरूममधील नळ गायब

तलावातील बाथरूममध्ये नळ उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले आहे. तलाव बंद असताना झालेल्या चोरीच्या घटनेनंतरही आवश्यक साहित्याची पूर्तता करण्यात आलेली नसल्याने तलाव सुरू झाल्यानंतर जलतरणपटूंची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे.

झाडाझुडपांचे साम्राज्य; सापांची भीती वाढली

पाच महिन्यांपासून तलाव बंद असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे आणि वेली वाढल्या आहेत. नियमित स्वच्छता न झाल्याने परिसरात अस्वच्छतेचे चित्र दिसत आहे. काही दिवसांपूर्वी या ठिकाणी साप दिसल्याचे सांगण्यात येत असल्याने जलतरणासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

पाच महिने मिळूनही दुरुस्ती का नाही? नागरिकांचा सवाल!

पाणीकपातीमुळे जून महिन्यापासून जलतरण तलाव बंद होता. या कालावधीत देखभाल, स्वच्छता आणि तांत्रिक दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यासाठी महापालिका प्रशासनाला पुरेसा वेळ होता. असे असतानाही अद्याप मूलभूत सुविधांची पूर्तता झालेली नाही. मग, अर्धवट तयारीनिशी तलाव सुरू करण्याची घाई कशासाठी? एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

बाथरूममध्ये नळ बसवलेले नाहीत. ते ठेकेदाराकडून सोमवारपर्यंत बसवून घेतले जातील. तसेच, परिसरातील झाडाझुडपांची साफसफाई करण्याबाबत वृक्ष प्राधिकरणाच्या विभागप्रमुखांशी चर्चा झाली आहे. येत्या दोन दिवसांत झाडाझुडपांची साफसफाई करून दिली जाईल.
पंकज पाटील, उपायुक्त, क्रीडा विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
गेल्या पाच महिन्यांपासून तलाव बंद असतानाही महापालिका प्रशासनाने आवश्यक दुरुस्ती आणि स्वच्छता का केली नाही? आजही २६ बाथरूममध्ये नळ नाहीत, इलेक्ट्रिक रूममध्ये पाणी साचले आहे. सुरक्षा व्यवस्थेचा अभाव आहे. परिसरात वाढलेल्या झाडाझुडपांमुळे सापांचा धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत तलाव सुरू करणे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य नाही. प्रशासनाने सर्व त्रुटी तातडीने दूर करूनच तलाव सुरू करावा. एखादी दुर्घटना घडल्यानंतर जागे होण्यापेक्षा आधीच खबरदारी घ्यावी.
आप्पा धावडे, स्थानिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT