पिंपळे गुरव: कासारवाडी येथील बीआरटीएस बसथांब्याकडे जाणाऱ्या पदपथाची दुरवस्था झाली आहे. उखडलेले पेव्हिंग ब्लॉक, खडी, माती आणि कचऱ्यामुळे पादचाऱ्यांना अडचणीचे ठरत आहे. दररोज मोठ्या संख्येने प्रवासी या मार्गाचा वापर करत असतानाही पदपथाच्या दुरुस्तीकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
कासारवाडी परिसरातील कामगार लांडेवाडी, भोसरी, निगडी, वल्लभनगर तसेच परिसरातील इतर भागांत जाण्यासाठी बीआरटीएस बससेवेचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. सकाळी आणि सायंकाळी बसथांब्यावर प्रवाशांची मोठी गर्दी असते. निगडी, वल्लभनगर, वायसीएम रुग्णालय, भोसरी आणि लांडेवाडीच्या दिशेने जाणाऱ्या बस या थांब्यावर थांबत असल्याने दिवसभर नागरिकांची वर्दळ सुरू असते, परंतु पदपथावरून प्रवास करताना समस्यांचा सामना करावा लागत आहे.
रुग्णालयात जाणाऱ्यांचीही गैरसोय
यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात जाणारे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांनाही या बीआरटीएस बसथांब्याचा वापर करावा लागतो. त्यामुळे रुग्ण, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि त्यांच्या नातेवाइकांचीही या पदपथावर सतत वर्दळ असते. मात्र, पदपथाची अवस्था खराब असल्याने त्यांना प्रवास करताना त्रास सहन करावा लागत आहे.
पदपथावर खडी-मातीचे ढिगारे
पदपथावरील अनेक पेव्हिंग ब्लॉक उखडले असून, काही ठिकाणी ते विस्कटले आहेत. पदपथालगत माती, खडी आणि कचरा साचला आहे. त्यामुळे चालण्यासाठी पुरेशी जागा राहत नाही. पावसामुळे या भागात चिखल होत असून, पाय घसरून पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.
मुख्य रस्त्यावरून चालण्याची वेळ
पदपथाची दुरवस्था झाल्याने नागरिकांना काही ठिकाणी नाईलाजाने मुख्य रस्त्याच्या कडेने चालावे लागते. या मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असल्याने पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः सकाळी व सायंकाळी गर्दीच्या वेळी अपघाताचा धोका वाढतो. त्यामुळे महापालिका प्रशासनाने या पदपथाची तातडीने पाहणी करावी, उखडलेले पेव्हिंग ब्लॉक पुन्हा बसवावेत, साचलेली खडी, माती व कचरा हटवावा आणि पादचाऱ्यांसाठी सुरक्षित व सुस्थितीतील मार्ग उपलब्ध करून द्यावा आणि महापालिकेने एखादी दुर्घटना घडण्याची वाट न पाहता पदपथाची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
कासारवाडी येथील बीआरटीएस बसथांब्याकडे जाणाऱ्या पदपथाची पाहणी करण्यात येईल. पदपथावरील उखडलेले पेव्हिंग ब्लॉक खडी, माती व कचरा याबाबत पाहणी करून आवश्यक ती दुरुस्ती करून घेण्यात येईल.संजय काशीद, कार्यकारी अभियंता, शहर दळणवळण विभाग, पिंपरी चिंचवड मनपा
लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी यांना उखडलेल्या पदपथावरूनच चालावे लागते आहे. पदपथावर पडलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी येते. प्रवाशांचा पाय घसरून पडण्याची शक्यता आहे. प्रशासनाने तात्काळ पदपथाची दुरुस्ती करावी.माऊली थोरात, सामाजिक कार्यकर्ते