Kasarwadi Bal Shivaji Memorial Pudhari
पिंपरी चिंचवड

Kasarwadi Bal Shivaji Memorial: कासारवाडीत साकारतेय ‘बाल शिवाजी’ स्मारक; नोव्हेंबरमध्ये होणार भव्य लोकार्पण

बालपणापासून राज्याभिषेकापर्यंतचा शिवचरित्राचा प्रेरणादायी प्रवास एका ठिकाणी; 3.95 कोटींच्या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात

पुढारी वृत्तसेवा

वल्लभनगर: कासारवाडी परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणापासून ते राज्याभिषेकापर्यंतचा प्रेरणादायी इतिहास जिवंत करणारे 'बाल शिवाजी' स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात येऊन पोहोचले असून, नोव्हेंबर महिन्यापर्यंत या भव्य प्रकल्पाचे काम पूर्ण होणार आहे. केवळ पुतळा उभारण्यापुरते मर्यादित न राहता शिवचरित्राचा सुवर्ण इतिहास भावी पिढीसमोर उभा करणारे हे स्मारक कासारवाडीच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वैभवात मोलाची भर घालणार आहे.

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी ३ कोटी ९५ लाख रुपयांचे टेंडर मंजूर करण्यात आले असून, स्मारकाचे घुमट, मंडप, रंगकाम आणि सुशोभीकरणाची कामे सध्या युद्धपातळीवर सुरू आहेत. अंतिम टप्प्यातील कामांना वेग देण्यात आला असून, नियोजित वेळेत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

शिवचरित्राचा प्रेरणादायी प्रवास एका ठिकाणी

या स्मारकाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते रायगडावरील राज्याभिषेकापर्यंतचा संपूर्ण ऐतिहासिक प्रवास चित्रांच्या माध्यमातून साकारला जाणार आहे. प्रत्येक टप्प्याची माहिती नागरिक आणि विद्यार्थ्यांना सहज समजावी यासाठी माहितीफलकही उभारण्यात येणार आहेत. याशिवाय शिवकालीन आठ प्रमुख किल्ल्यांच्या प्रतिकृती, राजमुद्रा आणि शिवकालीन पराक्रम दर्शविणारी आकर्षक चित्रे स्मारक परिसरात उभारली जाणार आहेत. त्यामुळे इतिहासप्रेमी, विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी हे स्मारक अभ्यासाचे आणि प्रेरणेचे महत्त्वपूर्ण केंद्र ठरणार आहे.

नागरिकांमध्ये उत्साह; दर्जेदार कामाची अपेक्षा

या स्मारकाबाबत स्थानिक नागरिकांमध्ये मोठा उत्साह असून, काम दर्जेदार पद्धतीने व नियोजित वेळेत पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. स्मारकाच्या लोकार्पणानंतर परिसरात स्वच्छता, सुरक्षा, नियमित देखभाल उद्यान आणि इतर मूलभूत सुविधांची व्यवस्था कायम ठेवावी, अशीही मागणी नागरिकांनी केली आहे. कासारवाडीतील हे 'बाल शिवाजी' स्मारक केवळ परिसराचे सौंदर्य वाढविणारे ठरणार नाही, तर शिवरायांचा पराक्रम, स्वराज्याची प्रेरणा आणि इतिहासाची ओळख नव्या पिढीपर्यंत पोहोचवणारे एक जिवंत प्रेरणास्थान म्हणून ओळख निर्माण करेल, असा विश्वास आहे.

आधुनिक रोषणाईने उजळणार स्मारक

स्मारकाला अधिक भव्य आणि आकर्षक स्वरूप देण्यासाठी अत्याधुनिक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. तसेच बालशिवाजींच्या मूर्तीला विशेष रंगसंगतीत रंगरंगोटी करून तिचे सौंदर्य अधिक खुलविण्यात येणार आहे. रात्रीच्या वेळी प्रकाशझोतात हे स्मारक कासारवाडीची नवी ओळख ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

या स्मारकातून एक महत्त्वाचा संदेश दिला जात आहे. प्रत्येक मुलाला घडविण्याचे सर्वात मोठे काम आई करते. आई हीच मुलाची पहिली गुरू असते. जिजाऊ मातांनी शिवरायांना दिलेले संस्कार, स्वाभिमान, धैर्य आणि न्यायाची शिकवण यामुळे शिवाजी महाराज घडले. त्यामुळे आजच्या पिढीनेही जिजाऊंचा आदर्श समोर ठेवून मुलांमध्ये चांगले संस्कार, विचार आणि देश प्रेम रुजवावे. हा पुतळा केवळ एक स्मारक नसून समाजाला संस्कार, बुद्धी आणि मातृशक्तीचे महत्त्व सांगणारा प्रेरणादायी संदेश आहे
शाम लांडे, नगरसेवक, कासारवाडी
कासारवाडीत उभारला जाणारा बाल शिवाजी स्मारक हे केवळ एक आकर्षण नसून, नवीन पिढीसाठी प्रेरणेचा स्त्रोत ठरेल. पुतळ्यातून संस्कार आणि जिजाऊंच्या मार्गदर्शनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. अशा स्मारकांमुळे मुलांमध्ये इतिहासाविषयी अभिमान निर्माण होईल आणि समाजालाही सकारात्मक संदेश मिळेल.
लहू लांडगे, सामाजिक कार्यकर्ता, कासारवाडी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT