Police Pudhari
पिंपरी चिंचवड

Police Officer Death: गुन्हेगाराचा पाठलाग करताना काळाचा घाला; पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील जावेद बागसिराज यांचे निधन

१६ वर्षे पोलिस दलात सेवा; कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्याच्या निधनाने पोलिस दलावर शोककळा, दोन मुलांचे पितृछत्र हरपले

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील जावेद बागसिराज या कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याने पोलिस दलावर शोककळा पसरली आहे. ते पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकात कार्यरत होते.

२०१० पासून पोलिस दलात कार्यरत

बागसिराज यांचे कुटुंब मूळचे कर्नाटकातील असून, त्यांच्या वडिलांनी कामानिमित्त पुण्यात स्थलांतर केले होते. बागसिराज यांचा जन्म पुण्यातच झाला. सन २०१० मध्ये ते पुणे शहर पोलिस दलात भरती झाले. सुरुवातीची आठ वर्षे त्यांनी हडपसर आणि मुंढवा पोलिस ठाण्यांत सेवा बजावली. सन २०१८ मध्ये पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालय सुरू झाल्यानंतर ते या पोलिस दलात रुजू झाले. सुरुवातीला पिंपरी पोलिस ठाण्यात काम केल्यानंतर त्यांची गुन्हे शाखेत नियुक्ती झाली. सध्या ते अमली पदार्थविरोधी पथकात कार्यरत होते.

कर्तव्यदक्ष कर्मचारी

कर्तव्यदक्ष आणि मेहनती कर्मचारी म्हणून बागसिराज यांची पोलिस दलात ओळख होती. गुन्हेगारांचा शोध घेणे आणि त्यांना पकडण्यासाठी ते नेहमीच तत्पर असत. दरम्यान, रविवारीही त्यांनी तत्काळ कारवाई सुरू केली होती. मात्र, गुन्हेगाराचा पाठलाग करतानाच काळाने त्यांच्यावर घाला घातला. त्यांच्या अकाली निधनामुळे सहकाऱ्यांना मोठा धक्का बसला असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही त्यांच्या कामाचे कौतुक करत शोक व्यक्त केला आहे.

कर्तव्यावर असतानाच मृत्यू

बागसिराज यांच्या अकाली निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या १२ वर्षांच्या मुलीचे आणि सात वर्षांच्या मुलाचे पितृछत्र हरपले आहे. पोलिस दलात तब्बल १६ वर्षे सेवा बजावणाऱ्या बागसिराज यांचा कर्तव्यावर असतानाच मृत्यू झाल्याने सहकाऱ्यांकडून हळहळ व्यक्त होत आहे.

मेहनती कर्मचारी गमावला

पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनीही बागसिराज यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. त्यांच्या निधनाने पोलिस दलाने एक कर्तव्यदक्ष आणि मेहनती कर्मचारी गमावल्याच्या भावना चौबे यांनी व्यक्त केल्या. या घटनेमुळे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT