पिंपरी : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे आणि नणंद करिष्मा हगवणे यांना न्यायालयाने पुन्हा पोलिस कोठडीत पाठवण्याचा निर्णय दिला आहे. याआधी त्यांना सुनावलेली पोलिस कोठडी संपल्याने सोमवारी (दि. २६) त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीनंतर न्यायालयाने या तिघांना २८ मेपर्यंत पुन्हा पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
पोस्टमॉर्टेम अहवालानुसार, वैष्णवीच्या शरीरावर तब्बल २९ जखमांचे व्रण सापडले असून, त्यातील ५ ते ६ जखमा आत्महत्येच्या काही तास आधीच्या असल्याचे निष्पन्न झाले आहे. या आधारावर पोलिसांनी वैष्णवीवर सासरच्या मंडळींकडून सतत शारीरिक आणि मानसिक छळ झाल्याचा निष्कर्ष काढला आहे. विशेष म्हणजे वैष्णवीवर होणारा हा अत्याचार लग्नानंतर सतत सुरू असल्याचे तपासातून समोर आल्याचे बावधनचे वरिष्ठ निरीक्षक अनिल विभूते यांनी सांगितले.
वैष्णवीला तिच्या सासरच्या मंडळींकडून हिंसक वागणूक, हुंड्याची मागणी, आर्थिक त्रास आणि मानसिक छळ यांचा सामना करावा लागत होता. तिच्यावर वेळोवेळी शारीरिक मारहाण केली जात होती, तर काही वेळा तिला उपाशी ठेवल्याचेही निदर्शनास आले आहे. या दैनंदिन छळामुळे वैष्णवीच्या मानसिक संतुलनावर परिणाम झाला होता, आणि अखेर तिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचे तपासात समोर आले आहे.
पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत पाच आरोपींना अटक केली असून, अन्य फरार आरोपीच्या शोधासाठी विशेष पथक रवाना करण्यात आले आहे. याशिवाय हगवणे कुटुंबीयांनी वापरलेले आर्थिक व्यवहार, फसवणूक, शस्त्र वापर, आणि बोगस तारण व्यवहार याचाही तपास सुरू आहे. या प्रकरणाला आता गुन्हेगारी मानसिकता, आर्थिक फसवणूक, आणि महिलांवरील अत्याचार यामुळे अधिक गांभीर्य प्राप्त झाले आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत आणखी काही आरोपींची अटक किंवा नवे खुलासे होण्याची शक्यता आहे.
पोलिसांनी न्यायालयात मांडलेले मुद्दे
हगवणे कुटुंबीयांची सर्व बँक खाती गोठवण्यात आली आहेत.
वैष्णवीच्या नावावरील ५१ तोळे सोने तारण ठेवून घेतलेली रक्कम कुठे आणि कशासाठी वापरली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या प्रकरणातील फरार आरोपी निलेश चव्हाण आणि हगवणे कुटुंबीय यांच्यातील संबंधांचा तपास करणे आवश्यक आहे.
तिन्ही आरोपींची एकत्रित चौकशी अत्यावश्यक असून, त्यातून नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता असल्याने वाढीव पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली होती.