पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या इंद्रायणी नदी पुनरुज्जीवन (सुधार) प्रकल्पास अखेर, मुहूर्त लागला आहे. इंद्रायणी नदीच्या एका बाजूच्या 19.50 किलोमीटर अंतराच्या प्रकल्पासाठी एकूण 430 कोटी 75 लाख 61 हजार 777 रुपये खर्चास स्थायी समितीने बुधवारी (दि.1) झालेल्या सभेत आयत्यावेळी मंजुरी दिली आहे. प्रकल्पाचे येत्या मंगळवारी (दि. 7) भूमिपूजन करण्यात येणार आहे. समितीची सभा अध्यक्ष अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली. सभेला समितीचे सदस्य, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त, कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, नगर सचिव मुकेश कोळप व अधिकारी उपस्थित होते.
समितीसमोर या प्रकल्पाचा प्रस्ताव ऐनवेळी सादर करण्यात आला. या प्रकल्पास शासनाकडून अमृत 0.2 मधून मान्यता मिळाली आहे. प्रकल्पासाठी अर्धा खर्च केंद्र व राज्य सरकार देणार आहे. महापालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागाने इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाची 443 कोटी 51 लाख 10 हजार रुपयांची निविदा 9 जानेवारी 2026 ला प्रसिद्ध केली होती. त्यात आठ ठेकेदारांनी सहभाग घेतला. त्यातील बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नोलॉजी, बीएसआर इन्फ्राटेक इंडिया, श्रीनिवासा कन्स्ट्रक्शन कॉ. प्रा. लि., इव्हायरो इन्फ्रा इंजि. लि. आणि केएमव्ही प्रोजेक्टस हे पाच ठेकादार अपात्र ठरले. तर, एलसी इन्फ्रा, एसएमसी इन्फ्रा व दिनेशचंद्र आर आगरवाल इन्फ्राकॉन हे तीन ठेकेदार पात्र ठरले.
त्यातील एलसी इन्फ्रा. प्रो. प्रा. लि.ची 3 टक्के कमी दराची निविदा स्वीकृत करण्यात आली आहे. निविदा प्रक्रिया योग्य प्रकारे राबवण्यात आली नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप वाघेरे व शिवसेनेच्या सुलभा उबाळे यांनी या प्रस्तावाला विरोध केला. त्यांचा विरोध नोंदवून 430 कोटी 75 लाख रुपये खर्चाला मंजुरी देण्यात आली. त्यातील निम्मा निधी केंद्र व राज्य सरकार महापालिकेस देणार आहे. तर, उर्वरित निम्मा खर्च महापालिका स्वत: करणार आहे. कामाची मुदत 3 वर्षे आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शहरवासीयांसह आळंदी तीर्थक्षेत्र येथे येणार्या लाखो वारकर्यांना इंद्रायणी नदीत स्वच्छ पाणी मिळणार आहे, असा दावा अधिकार्यांनी केला आहे.
निघोजे ते चर्होली असे एका बाजूच्या नदीकाठाचे काम होणार
इंद्रायणी नदीची एक बाजू पिंपरी-चिंचवड शहर हद्दीतून तर, दुसरी बाजू पीएमआरडीए हद्दीतून वाहते. निघोजे ते चर्होली असे 18.50 किलोमीटर अंतर नदीच्या एका बाजूने महापालिका हा प्रकल्प राबविणार आहे. या प्रकल्पातच चिखलीतील रिव्हर रेंसिडन्सी येथे 40 एमएलडी क्षमतेचा मैलासांडपाणी शुद्धीकरण केंद्र (एसटीपी) आणि डुडुळगाव येथे 20 एमएलडीचा दुसरा एसटीपी बांधण्यात येणार आहे. नाले व ड्रेनेजलाईनद्वारे थेट इंद्रायणी नदीत मिसळणारे सांडपाणी एसटीपीकडे वळविले जाणार आहेत. नदी काठावर सुशोभिकरण करून देशी झाडे लावून हरित क्षेत्र निर्माण केले जाणार आहे. नदीकाठावर हिरवळ व शोभिवंत झाडे लावून उद्यान विकसित केले जाणार आहे. जॉगिंग ट्रॅक व पादचारी मार्ग तसेच, विसर्जन घाट विकसित केले जाणार आहेत.
महापालिकेसोबतच ‘पीएमआरडीए’नेही काम सुरू करणे अत्यावश्यक
उगमापासून इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त होणे गरजेचे आहे. पीएमआरडीए, पिंपरी-चिंचवड महापालिका, लोणावळा, तळेगाव दाभाडे, आळंदी या तीन नगर परिषद, वडगाव व देहू या दोन नगरपंचायती, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड तसेच, 49 ग्रामपंचायत यांच्या हद्दीतून इंद्रायणी नदी वाहते. महापालिकेने प्रकल्प राबविण्यासोबत इतर सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी प्रकल्प पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. नदीत रासायनिक व इतर सांडपाणी मिसळणार नाही, याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. महापालिकेसोबत पीएमआरडीएसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांनी काम सुरू करणे आवश्यक आहे. त्याशिवाय हा प्रकल्प यशस्वी होऊ शकणार नाही, असे पर्यावरणप्रेमींचे मत आहे.
प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
इंद्रायणी नदी पाणी लाखो वारकरी तिर्थ म्हणून प्राशन करतात. येत्या मंगळवारी (दि.7) देहू गावातून जगद्गगुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचे आगमन आहे. त्या काळात इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाचे भूमिपूजन व्हावे म्हणून त्या विषयाला ऐनवेळी मान्यता देण्यात आली आहे. त्या प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. इंद्रायणी नदीच्या एका बाजूने काम पिंपरी-चिंचवड महापालिका करणार आहे. तर, दुसर्या बाजूने पीएमआरडीएला काम करण्याच्या सूचना मंत्री माधुरी मिसाळ यांनी पूर्वीच दिल्या आहेत, असे स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी सांगितले.