Rice Pudhari
पिंपरी चिंचवड

Indrayani Rice Price: इंद्रायणी तांदळाच्या दरात मोठी वाढ; किलोचा भाव ८५ रुपयांवर

कमी पावसामुळे भात उत्पादनात घट; वर्षभरात किलोमागे १५ ते २० रुपयांची वाढ, किरकोळ बाजारात दर शंभरीपार जाण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

रावेत: यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याचा परिणाम आता शेती उत्पादनावर दिसू लागला आहे. कमी पावसामुळे भातपिकाच्या उत्पादनात घट झाली असून, बाजारात तांदळाची आवक तुलनेने कमी होत आहे. याचा थेट परिणाम तांदळाच्या दरावर झाला असून, लोकप्रिय इंद्रायणी तांदळाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे.

घाऊक बाजारातच इंद्रायणी तांदळाचा दर प्रतिकिलो ८० ते ८५ रुपयांपर्यंत पोहचला आहे. आगामी काळात ही दरवाढ कायम राहिल्यास किरकोळ बाजारात तांदळाचे दर प्रतिकिलो १०० रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

बाजारात तांदळाचा पुरवठा झाला कमी

महाराष्ट्रात इंद्रायणी तांदळाला मोठी मागणी असते. विशेषतः पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात या तांदळाला ग्राहकांची पसंती आहे. मात्र, यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने भातशेतीवर विपरीत परिणाम झाला आहे. अपेक्षित उत्पादन न मिळाल्यामुळे बाजारात तांदळाचा पुरवठा कमी झाला आहे. मागणी कायम असताना उपलब्धता घटल्याने दरवाढीचे चित्र निर्माण झाले आहे.

वर्षभरात किलोमागे १५ ते २० रुपयांची वाढ

मागील वर्षी इंद्रायणी तांदळाचे दर सरासरी प्रतिकिलो ६५ ते ७० रुपये होते. मात्र, यंदा हेच दर घाऊक बाजारात ८० ते ८५ रुपयांपर्यंत पोहचले आहेत. म्हणजेच, वर्षभरात प्रतिकिलो सुमारे १५ ते २० रुपयांची वाढ झाली आहे. घाऊक बाजारातच एवढे दर असल्याने किरकोळ बाजारात ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागत आहेत.

गृहिणींचे आर्थिक गणित बिघडले

तांदळाच्या दरवाढीचा परिणाम सर्वसामान्य कुटुंबांच्या मासिक बजेटवर होण्याची शक्यता आहे. आधीच जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढत असताना तांदळाच्या दरात झालेली वाढ गृहिणींचे आर्थिक गणित बिघडवणारी ठरत आहे. पावसाचे प्रमाण कमी राहिल्यामुळे निर्माण झालेली उत्पादनातील घट ही आगामी काळात अन्नधान्याच्या बाजारपेठेसमोर आव्हान ठरण्याची चिन्हे आहेत.

गेल्या वर्षी इंद्रायणी तांदूळ थेट मिलमधून ६२ रुपये दराने खरेदी केला होता. यंदा त्याच तांदळाचे दर ८० रुपयांच्या पुढे गेले आहेत. वाढत्या महागाईमुळे घरखर्चाचे गणित बिघडले आहे. त्यात दुष्काळसदृश परिस्थितीमुळे अन्नधान्याच्या किमतीत वाढ झाल्याने गृहिणींचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. रोजच्या जेवणातील महत्त्वाचा भाग असलेल्या तांदळाच्या दरवाढीचा आर्थिक फटका सर्वसामान्य कुटुंबांना बसत आहे.
प्रा. मनीषा पाटील, गृहिणी, निगडी प्राधिकरण
यंदा तांदळाचे उत्पादन कमी झाल्याने बाजारात तांदूळ तुलनेने कमी उपलब्ध आहे. मागील वर्षी सरासरी ६५ ते ७० रुपये असलेला इंद्रायणी तांदूळ यंदा ८० रुपयांच्या जवळपास मिळत आहे. उत्पादनातील घट आणि बाजारातील कमी आवकेमुळे दर वाढले आहेत.
रितेश मोरे, स्थानिक व्यापारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT